|| संतोष जाधव

सुरक्षारक्षक उरले पगारापुरते; ४६ जणांची नेमणूक

महापालिकेने तलावांच्या सुरक्षेसाठी प्रत्येकी दोन सुरक्षारक्षक नेमले आहेत, मात्र वारंवार सापडणारे मृतदेह व तलावात बुडून होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमुळे तलावांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे. हे सुरक्षारक्षक नेमके असतात तरी कुठे? असा सवाल नवी मुंबईकर विचारत आहेत.

तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याच्या घटना या अधूनमधून होतच असतात. गेल्या आठवडयात जुईनगर येथील चिंचोली तलाव परिसरात एकाची हत्या करून मृतदेह तलाव परिसरात टाकल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तलावांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नवी मुंबई शहरात असलेल्या मूळ गावठाणांच्या ठिकाणी तलाव आहेत. हे तलाव शहराच्या सौंदर्यात भर टाकत असल्याने सर्वच तलावांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. आकर्षक घाट तर तलावाजवळील स्वागत कमानी, त्याचबरोबर गणेश विसर्जनासाठी पाणी दूषित होऊ  नये यासाठी तयार करण्यात आलेली इटालियन गॅबीयन वॉल, आकर्षक स्वागत कमानींसाठी जोधपुरी मार्बलचा केलेला वापर केला आहे. तसेच भोवतालचा परिसरही आकर्षक करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांची येथे वर्दळ पाहायला मिळते.

शहरातील तलावात पडून मृत्यू होण्याच्या वाढत्या घटनांमुळे पालिकेने शहरातील सर्वच २४ तलावांवर ४६ सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. सकाळी ७ ते दुपारी ३ व दुपारी ३ ते रात्री १० या कालावधीत या ठिकाणी सुरक्षारक्षक ठेवण्यात आले आहेत. परंतु, कामाच्या वेळेत हे सुरक्षारक्षक या ठिकाणी हजर असतात का? की फक्त हजेरीपुरतेच हजर राहतात असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नुकत्याच झालेल्या जुईनगर तलावातील घटनेप्रमाणे ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील पाण्यातही एकाचा मृतदेह तरंगताना पाहायला मिळाला होता. त्यामुळे सुरक्षारक्षकांची हजेरी घेण्याची मागणी होत आहे.

रात्रीच्या वेळी तळीरामांचा वावर

शहरातील मैदानांबरोबरच तलाव परिसर रात्रीच्या वेळी गर्दुल्ले तसेच तळीरामांचे अड्डे बनले आहेत. नागरिकांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाच ते शिवीगाळ करत आहेत. नुकतचा एका विद्यार्थ्यांचा मैदानात खेळताना काच लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच जुईनगर येथील चिंचोली तलावालगत उद्यानात दारूपित बसलेल्या मित्रांत झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या तळीरामांना र्निबध घालण्याची गरज आहे.

तलावांवर सुरक्षारक्षक नेमलेले आहेत. दोन पाळींत ते काम करीत आहेत. रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नसतात. या सर्वावर पालिकेचे नियंत्रण आहे. परंतु याची दक्षता घेतली जाईल.   – दादासाहेब चाबुकस्वार, उपायुक्त परिमंडळ १