उरणकरांवर तीव्र पाणीटंचाईचे सावट

उरणला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणात सध्या मृतसाठय़ातून पाणी पुरवले जात असून फक्त दहा दिवस पुरेल एवढेच पाणी शिल्लक आहे. त्यामुळे उरणकरांवर तीव्र पाणी टंचाईचे संकट आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असेही आवाहन एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

मान्सून लांबल्याने पाणीटंचाईच्या तीव्र झळा राज्यभर बसत आहेत. शेतकऱ्याची चिंताही वाढली आहे. सर्वच धरणांनी तळ गाठला आहे. उरणमधील रानसई धरणांचीही तीच अवस्था आहे. एमआयडीसीकडून धरणातील पाण्याचे नियोजन केले जात असून उरणमधील २५ ग्रामपंचायती, उरण नगरपालिका तसेच औद्योगिक विभागाला पाणीपुरवठा केला जातो.

या संदर्भात उरण एमआयडीसीचे उपअभियंता रणजित बिरंजे यांच्याशी संपर्क साधला असता, सध्या धरणाची पातळी ही ८४ फुटांची असून मागील वर्षी ती ९४ फुटांची होती. मृतसाठय़ातून पाणीपुरवठा केला जात असला तरी येत्या ३० जूनपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा धरणात आहे. या धरणक्षेत्रात आतापर्यंत ८८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.