पाणी देयक न भरल्याने आठ दिवस पुरवठा खंडित; थकित देयकामुळे वीज पुरवठाही खंडित

उलवा येथील सेक्टर १९ मधील सिडकोच्या उन्नती गृहप्रकल्पाचा पाणीपुरवठा आठ दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे. या संकुलात तेराशे सदनिका आहेत. सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे आणि महावितरण कंपनीचे देयक थकवल्याने ही स्थिती ओढावली आहे. सिडकोने गृहनिर्माण सोसायटीकडे हा प्रकल्प वेळीच हस्तांतरित न केल्याने ही वेळ आली आहे, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

सिडको मंडळाने एक हजार ३४४ सदनिका असलेला उन्नती गृहप्रकल्प उभारून अत्यल्प उत्पन्न व उच्च मध्यमवर्ग या गटांतील रहिवाशांना घरे उपलब्ध करून दिली. येथील रहिवासी अनेक वर्षांपासून पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत. उन्नती गृहप्रकल्पामध्ये ४२ इमारती आहेत. १३३ सदनिका अद्याप सिडको मंडळाने वितरित केलेल्या नाहीत. सिडकोचे सुमारे ३७ लाख रुपयांचे पाणी देयक थकल्याने पाणीपुरवठा खंडित करण्यात आला होता. रहिवाशांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन ३० तारखेपर्यंत थकीत पाणी देयक भरू, असे शपथपत्र दिले. त्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात आला, मात्र त्याच वेळी महावितरणने पाण्याच्या पंपाच्या देयकाची १० लाख रुपयांची थकबाकी असल्यामुळे  वीजपुरवठाही खंडित केला. अखेर मंगळवारी रहिवाशांनी विजेचे निम्मे देयक दिल्यानंतर दुपारी उन्नती निम्म्या सदनिकांचा पाणीपुरवठा सुरू झाला. अद्याप सुमारे ६०० सदनिकांना पाणीपुरवठा बंद आहे.

सिडको मंडळाने सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या नियमांप्रमाणे उन्नती गृहनिर्माण सोसायटीची स्थापना करून या प्रकल्पाच्या हस्तांतराची प्रक्रिया करणे गरजेचे होते, मात्र तसे त्यांनी केले नाही, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. यापूर्वी काही विकासकांनी रहिवाशांना अंधारात ठेवून, चोरून पाण्याचा व विजेचा वापर केल्यामुळे जुने पाणी व विजेची देयके रहिवाशांनी का भरावीत, असा प्रश्न रहिवाशांना पडला आहे.

सिडको मंडळाने अत्यल्प उत्पन्न गट व मध्यमवर्गीयांचा आर्थिक निकष ध्यानात ठेवून हा गृहप्रकल्प उभा केला होता. रेरा कायद्यानुसार विकासक म्हणून सोसायटी स्थापन करून देण्याची जबाबदारी सिडको मंडळाची असल्याने या संपूर्ण पाणीसंकटाला सिडको मंडळाचे अधिकारी व हा प्रकल्प बांधणारी कंपनीच जबाबदार आहेत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे.

विकासकांची कोटय़वधींची देयके शिल्लक

उलवा वसाहतीप्रमाणे कामोठे वसाहतीतही मोठय़ा प्रमाणात पाणी देयके थकविण्यात आली आहेत. सिडको मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार सेक्टर ६ येथील भूखंड क्रमांक १ वरील विकासकांनी एक कोटी १९ लाख रुपये, सेक्टर ६ अ, भूखंड क्रमांक २६ येथील विकासकाने ५६ लाख रुपये, याच सेक्टरमधील भूखंड क्रमांक ६३ अ वरील विकासकांनी २२ लाख रुपये, सेक्टर ९ मधील भूखंड क्रमांक ४२ वरील विकासकाने १७ लाख रुपये, सेक्टर ११ भूखंड क्रमांक ५५ येथील विकासकाने ३४ लाख रुपये, सेक्टर १६ भूखंड क्रमांक १६ येथील विकासकाने एक कोटी ७ लाख रुपये, सेक्टर ३४ येथील भूखंड क्रमांक १,२,४,५, २६,२९ यावरील विकासकाने सर्वाधिक म्हणजेच १ कोटी ८८ लाख रुपयांची देयके थकविली आहेत. तेथील रहिवासी भोगवटा प्रमाणपत्राविनाच राहात आहेत.

पाणी देयक न भरल्यामुळे पाणीपुरवठा खंडित केला होता. रहिवाशांच्या हमीपत्रानंतर तो पूर्ववत करण्यात आला. ३० जानेवारीपर्यंत पाणी देयक भरण्याचे रहिवाशांच्या प्रतिनिधींनी कबूल केले आहे. त्यामुळे यापुढे पाणीपुरवठा सुरळीत राहील.

– दिलीप बोकाडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, सिडको