उरण तालुक्यातील रानसई धरणाशेजारीच भुऱ्याची व खैरकाठी या दोन आदिवासी वाडय़ा असून, या दोन्ही वाडय़ांवर पाणीटंचाई आहे. याचे वृत्त प्रसिद्ध होताच उरणच्या प्रशासनाला जाग आली. त्यानंतर तातडीने उरणच्या नायब तहसीलदारांनी वाडीवर जाऊन पाहणी केली. परिणामी, तहसील कार्यालयाकडून शुक्रवारपासूनच तातडीने या दोन्ही वाडय़ांना दहा हजार लिटर पाण्याचा टँकरने पुरवठा करण्यात आला. त्यामुळे या दोन्ही वाडय़ांवरील महिला व नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
धरण उशाला आणि कोरड घशाला, अशी स्थिती रानसई परिसरातील भुऱ्याची व खैरकाठी या दोन वाडय़ांची गेली अनेक वर्षे आहे. पिण्याचे पाणी मिळावे याकरिता हातपंप लावण्यात आलेले आहेत. मात्र धरण शेजारी असूनही भूगर्भातच पाणी कमी असल्याने पाचपैकी चार हातपंपाना पाणी नाही. तर एका पंपाला असलेले पाणी भरण्यासाठी एका हंडय़ाला अर्धा तास लागत आहे.
त्यामुळे या दोन्ही वाडय़ांवरील महिलांना व नागरिकांना केवळ पाण्यासाठीच दिवसरात्र खर्च घालावे लागत आहेत. याचे वृत्त वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर उरणच्या तहसील कार्याला जाग आली. त्यानंतर चिरनेर येथील टँकरमालकाला दिवसाला एक टँकरचा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
या दोन्ही वाडय़ांच्या मध्यभागी एक साठवणूक टाकी आहे. मात्र या टाकीची सफाई न झाल्याने पिण्यासाठी टाकण्यात आलेले पाणी येथील आदिवासींना पिता येत नसल्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी टाकीची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. तर पावसाळा सुरू होईपर्यंत हा पाणीपुरवठा सुरू राहणार असल्याची माहिती उरणचे नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांनी दिली. आदिवासी वाडीवरील पाणीपुरवठय़ाची माहिती प्रशासनाला नसल्याबद्दल मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.