नवी मुंबईतील ऐरोलीतील एका दुकानात लागलेल्या आगीत मायलेकीचा अंत झाल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. धुरात गुदमरुन त्या दोघींचा मृत्यू झाला. मंजू चौधरी (२५) आणि त्यांची मुलगी गायत्री (५) अशी मृतांची नावे आहेत. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ऐरोलीतील सेक्टर- ३ मध्ये चौधरी कुटुंबीयांचे ‘फॅशन ब्युटी’ हे नॉव्हेल्टीचे दुकान आहे. दुकानाच्या वर चौधरी कुटुंबीयांचे घर आहे. बुधवारी रात्री दुकान बंद करुन चौधरी कुटुंबीय घरात झोपायला गेले. गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास घरात आग लागली. मंजू यांचे पती एक वर्षाच्या मुलासह दुकानातून बाहेर आले. मात्र मंजू आणि गायत्री बाहेर येऊ शकले नाही. आगीतील धुरात गुदमरुन मायलेकीचा अंत झाला. दुकानात प्लास्टिकची खेळणी आणि अन्य साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आग वेगाने पसरत गेली. घरात काळोख असल्याने मायलेकीना बाहेर पडता आले नाही, असे समजते. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे काही वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, गुरुवारी पहाटे मुंबईतील अंधेरी येथील मित्तल इस्टेट येथेही एका प्रिटींग प्रेसमध्ये आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. तर बाकीच्या कर्मचाऱ्यांनी बाहेर पळ काढल्याने ते बचावले. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे ४ बंब आणि ४ वॉटर टँकर्सनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.