वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील सिडको प्र्दशन केंद्रात उभारण्यात येणाऱ्या एक हजार खाटांचे विशेष कोविड रुग्णालयाचे काम संथगतीने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांपूर्वी ‘कोव्हिड’ रुग्णालय उभारणीच्या कामाची पाहणी करून काम वेगात पूर्ण करण्याची सूचना केली आहे. नवी मुंबईतील रुग्णांचा आकडा एक हजाराच्या पुढे गेला आहे. दहा हजार संशयित रुग्णांचे घरी अलगीकरण करण्यात आले आहे. झोपडपट्टी भागातही संक्रमण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोव्हिड रुग्णालयाचे काम संथगतीने सुरू असल्याचे मत केंद्रीय आरोग्य पथकातील डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

सिडकोने वाशी सेक्टर-३० येथे मुंबई, दिल्लीच्या धर्तीवर एक प्र्दशन केंद्र उभारले आहे. २०० कोटींहून अधिक खर्च केलेल्या या केंद्राचा प्रयोग फसल्याचे मानले जाते. त्यामुळे वार्षिक पाच कोटी रुपयांच्या ठोस उत्पनावर सिडकोने या प्र्दशन केंद्राचे कंत्राट दिले आहे. सिडको केंद्रापेक्षा बंदिस्त अशी दुसरी जागा नवी मुंबईत नाही. त्यामुळे या ठिकाणी एक हजार ते १,२०० खाटांचे रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव पालिकेच्या वतीने तयार करण्यात आला. त्याआधी या ठिकाणी शहरातील गावाकडे जाणारे मजूर, कामगार यांच्यासाठी निवारा केंद्र तयार करण्यात आले होते. आता या ठिकाणी पालिकेच्या वतीने तात्पुरत्या स्वरूपात एक हजार खाटांचे रुग्णालय उभारले जाणार आहे. मात्र, केंद्र उभारणीचा वेग मंद असल्याचे मत केंद्रीय पथकातील तज्ज्ञांनी केले आहे.