तळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रकार
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील दीपक फर्टिलायझर्स कंपनीसारख्या मोठय़ा कारखान्यामध्ये माल घेऊन येणारे ट्रक, अमोनिया वायूचे टँकर लघुउद्योगांच्या सेवा रस्त्यावर अवैधपणे उभे राहात असल्याने लहान उद्योजक हैराण झाले आहेत. सेवा रस्त्यावरील अवैध दुहेरी पार्किंगवर कारवाई करावी यासाठी नवी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही हा प्रश्न न सुटल्याने या लहान उद्योजकांनी प्रशासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे.
मागील वर्षभरापासून येथील जड वाहने लघुउद्योगांच्या सेवारस्त्यावर उभी केली जात असल्याने या उद्योजकांना स्वत:च्या कारखान्यात जाणे मुश्कील झाले आहे. लघुउद्योजक दिलीप परुळेकर व शामसुंदर कारकून यांनी तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोशिएशनकडे (टीएमए) याबाबत तक्रार केली आहे. यानंतर टीएमएने वाहतूक विभागाचे लक्ष वेधले, मात्र तरीही हा प्रश्न सुटला नाही. औद्योगिक मंडळाच्या विकास आराखडय़ानुसार मोठय़ा कारखान्यांची निर्मिती होत असताना दहा टक्के जागा कारखान्यामध्ये येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी राखीव ठेवण्याचा नियम आहे. हा नियम मोठे कारखाने पायदळी तुडवत असल्याचे एमआयडीसीचे अधिकारी सांगतात. अनेक लहानमोठय़ा कारखान्यांनी पार्किंगच्या जागेत इतर प्रकल्प राबवले आहेत. टीएमएने २१ ऑक्टोबरला विविध कंपन्या व प्रशासनाच्या प्रतिनिधींची बैठक बोलाविली. यामध्ये पोलीस, वाहतूक पोलीस अधिकारी उपस्थित होते. काही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी एक नोव्हेंबरपासून जड वाहने हटविण्याचे मान्य केले. परंतु यात फरक न पडल्याने लघुउद्योजकांनी १६ नोव्हेंबरला उपोषण करणार असल्याचे पत्र औद्योगिक विकास महामंडळ आणि पोलीस विभागाला दिले आहे. ही वाहने दीपक फर्टिलायझर्स कंपनीत येणारी असून त्यामध्ये अमोनियासारख्या घातक वायूचे टँकर रस्त्यावर अवैधपणे उभे राहात असल्याचे या लघुउद्योजकांनी म्हटले आहे.
याबाबत दीपक फर्टिलायझर्स कंपनीच्या व्यवस्थापक जयश्री काटकर म्हणाल्या की आमच्या कंपनीची स्वत:ची वाहने नाहीत. कारखान्यामध्ये लागणाऱ्या मालासाठी ही वाहने येतात. कंपनीच्या गेटसमोर अवैध पार्किंग होऊ नये यासाठी कंपनीने दोन रखवालदार नेमले आहेत. कंपनी एका महिन्याच्या आत पार्किंगसाठी स्वत:ची जागा निर्माण करीत आहे. आमच्या प्रकल्पामुळे शेजारील लघुउद्योजकांना त्रास होऊ नये हीच आमची भूमिका आहे.
दरम्यान तळोजा वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक गायकवाड यांनी गुरुवारी अवैधरीत्या उभ्या केलेल्या तब्बल ११ वाहनांवर कारवाई केली.