News Flash

जासईत वाढत्या वस्तीचा नागरी सुविधांवर ताण

जासई जिल्हा परिषद मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली आहे. २

 

औद्योगिक विकास, त्यामुळे वाढलेली लोकसंख्या, मूळ गावकऱ्यांपेक्षा जास्त असलेले आणि एकाच घरात दाटीवाटीने राहणारे भाडेकरू यामुळे जासईतील पायाभूत सुविधांवर ताण येत आहे. एमआयडीसीच्या रानसई तसेच हेटवणे या दोन्ही धरणांतून पाणीपुरवठा होत असला तरी जासई ग्रामपंचायत वगळता इतर गावांत पाणी, गटार आणि अन्य नागरी सुविधांची वानवा आहे. राज्य, राष्ट्रीय महामार्ग तसेच मुंबईला जोडणाऱ्या न्हावा शेवा-शिवडी सागरी सेतूसाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत, मात्र मोबदला आणि पुनर्वसनाचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत.

जासई जिल्हा परिषद मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आली आहे. २०१२ तसेच २०१४ च्या पोटनिवडणुकीत नवघर जिल्हा परिषद मतदारसंघात असलेल्या सोनारी, करळ व सावरखार या तिन्ही गावांचा जासई मतदारसंघात समावेश करण्यात आला आहे. या तीनही जेएनपीटीबाधित गावांत नवी मुंबईतील वाशी बाजारपेठेतील दरांत विविध वस्तूंची विक्री केली जाते. त्यामुळे येथे उरण तालुक्यातील घाऊक बाजारपेठ तयार झाली आहे. या मतदारसंघात बंदरावर आधारित खासगी गोदामांची संख्या अधिक आहे. त्यामुळे बाहेरून येऊन या परिसरात रोजगार तसेच व्यवसाय करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांच्यासाठी स्थानिकांनी भाडय़ाची घरे बांधली आहेत. या भाडेकरूंमध्ये अनधिकृत व्यवसाय करणारेही आढळत आहेत. याच परिसरात बांगलादेशी मजुरांवर कारवाई करण्यात आली होती.

जासई हे दि. बा. पाटील यांचे आणि हुतात्म्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. इथे सिडकोने मॉडेल व्हिलेजचा आराखडा तयार केला आहे. धुतूमच्या अनेक तरुणांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे. येथील गावांना स्वतंत्र मार्गिका देण्याचाही प्रश्न आहे.

जासईतील गावे आणि लोकसंख्या

जासई मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या २०,००५ आहे. यात ९ हजार ८८४ पुरुष, तर १० हजार १२१ महिला मतदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात महिला मतदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. उरणमधील जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी जासई हा सर्वात कमी मतदार संख्येचा मतदारसंघ आहे. त्यात जासई, धुतूम, रांजणपाडा, सुरुंगपाडा, चिर्ले, गावठाण, जांभूळपाडा, वेश्वी दादरपाडा, दिघोडे, कंठवली, विंधणे, धाटकटी जुई, बोरखार या गावांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 12:10 am

Web Title: zp election raigad 2017
Next Stories
1 बेकायदा झोपडय़ांचा राजकीय पुळका
2 नैसर्गिक आपत्तींनी ग्रासलेले चिरनेर
3 अल्पशिक्षित, गुन्हेगारही नशीब अजमावणार
Just Now!
X