परवाने नूतनीकरण

मुदत संपलेल्या रिक्षा परवान्यांना नवसंजीवनी देण्यासाठी परिवहन विभागाने चालवलेल्या विशेष मोहिमेत वाशीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दंड आणि शुल्काच्या स्वरूपात २ कोटी १६ लाख १० हजार ५०० रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

परिवहन विभागाकडून परवाने नूतनीकरणासाठी ३० ऑक्टोबरची मुदत देण्यात आली होती.

मात्र त्याला रिक्षाचालकांचा अल्प प्रतिसाद मिळाला, त्यामुळे ही मुदत प्रथम १६ व नंतर ३० नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आली. या मुदतीत एकूण आठशे नव्वद परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले. त्यातून सव्वादोन कोटींचा महसूल जमा झाला.

वाशी उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात मुदत संपलेले सुमारे ५ हजार रिक्षा परवाने आहेत. यातील केवळ आठशे नव्वद परवाने नूतनीकरण झाले आहे.

परवान्यांची मुदत संपल्यानंतर वेळेत त्याचे नूतनीकरण न केल्याने अनेक परवान्यांना जबर दंड बसला होता. हा दंड टाळण्यासाठी अनेक रिक्षाचालकांनी परवान्यांचे नूतनीकरण केले नाही. यातील काही रिक्षाचालकांनी नवीन परवानेही काढले.