नवीन पनवेल रस्त्यावरील ५ पैकी ३ सिग्नल बंद

( सीमा भोईर )पनवेल : पनवेल शहरात पादचाऱ्यांच्या अपघातांचे प्रमाण वाढले असताना शहरातील बहुतेक सिग्नल्स बंद आहेत. शहर वाहतूक शाखेकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, गेल्यावर्षी शहरात १०० अपघातांमध्ये ६० पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तरीही वाहतूकशाखा बंद सिग्नलकडे दुर्लक्ष करत आहे.

शहरात आंबेडकर चौक, अमरधाम, एसटी थांबा येथील रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची तारांबळ उडत आहे. पनवेलच्या मुख्य रस्त्यावर एसटी थांब्यासमोर, आंबेडकर पुतळ्याजवळ, अमरधाम नाका, गार्डन हॉटेल, नवीन पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी असे एकूण पाच सिग्नल्स आहेत. त्यापैकी एस.टी स्टॅण्ड जवळील, आंबेडकर पुतळया जवळील आणि अमरधाम नाका येथील सिग्नल बंद आहेत. त्यामुळे रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांची तारांबळ उडत आहे.

पनवेल शहरात प्रत्येक चौकात अनेक वाहनचालक सिग्नल्सचे उल्लंघन करतात. काहीजण हिरवा दिवा लागण्यापूर्वीच वाहने पुढे दामटतात. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे कठीण झाले आहे. त्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. किरकोळ दुरुस्तीअभावी तसेच तांत्रिक समस्यांमुळे हे सिग्नल बंद आहेत. त्यामुळे वाहने वाटेल तशी चालवली जात आहेत.

गेल्या वर्षी अमरधाम येथील सिग्नल सुरु करण्यात आला होता, मात्र आता तो पुन्हा बंद पडला आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांना स्वतच उभे राहून वाहनांना दिशा दाखवावी लागत आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा भार वाढून वाहतूक पोलीस आणि वाहनचालकांतील वादविवाद वाढले आहे.

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तीन वर्षांपूर्वी हे सिग्नल बंद करण्यात आले होते. या बंद सिग्नलचा अभ्यास करून ते पुन्हा सुरू करण्यात येतील.

– अभिजीत मोहिते, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा

बंद पडलेले सिग्नल सुरू झाले पाहिजेत, कारण तिथे वाहतूक पोलिस नसले की फार पंचाईत होते. कुणीही कसेही वाहने चालवतात त्यामुळे रस्ता ओलांडणे कठीण होते. जर सिग्नल सुरू झाले तर या सगळ्या गोष्टी आटोक्यात येतील.

– भारती ढवळे, रहिवासी, पनवेल</strong>