गुरुवारपासून ३३ टक्के पाणीकपात

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत मोठय़ा प्रमाणावर पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये ३३ टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. याची अंमलबजावणी गुरुवारपासून होणार असल्याने येथील उद्योजकांवर पाण्याची उसनवारी करण्याची वेळ आली आहे. तळोजा येथील उद्योजकांच्या संघटनेने (टीएमए) यासाठी राज्याच्या उद्योगमंत्र्यांची भेट घेतली असून त्यांच्याकडे विंधन विहिरी खणण्याची परवानगी मागितली आहे.

९०० हेक्टर जमिनीवर वसलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये एकूण साडेसातशे कारखाने आहेत. या कारखान्यांना सुमारे ४५ दशलक्ष घन लिटर पाण्याची आवश्यकता आहे. रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांमध्ये पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे पाणी न मिळाल्यास काही कारखान्यांची उत्पादने थांबण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने वसाहतीमधील कारखान्यांसाठी काढलेल्या परिपत्रकानुसार आठवडय़ामधील गुरुवार व शुक्रवार हे दोन दिवस ४८ तास पाण्याविना वसाहत राहणार आहे. त्यामुळे उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. पुढील तीन दिवस या परिसरात पाणीटंचाई असेल. गेल्या वर्षीही पाणीकपातीवेळी कारखान्यांनी स्थानिक ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवण्याचा ठेका देऊन या प्रश्नी मार्ग काढला होता, परंतु ते पाणीही दूषित होते. त्यामुळे उत्पादनासाठी शुद्ध पाणी कोठून मिळणार हा प्रश्न आहे. वसाहतीमध्ये दीपक फर्टिलायझर्स, बॉम्बे ब्रेव्हरीज, हिंदाल्को, टेक्नोव्हा, एक्साइड, व्ही. व्ही. एफ, वोसी इंडिया, विस्टा फूडस, हायकल, आयजीपीएल आणि कोल्ड स्टोरेज आदी प्रक्रिया करणारे मोठे कारखाने आहेत. या व्यतिरिक्त लहान रासायनिक उद्योगदेखील आहेत. पाणीकपातीच्या निर्णयामुळे गुरुवार, शुक्रवारसोबत शनिवार व रविवारी कारखाने बंद ठेवण्याची वेळ कारखानदारांवर आली आहे. त्यामुळे उद्योजकांच्या संघटनेच्या सचिव (तळोजा मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन) जयश्री काटकर व त्यांच्या शिष्टमंडळाने राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची नुकतीच भेट घेतली. ही पाणीकपात करू नये अथवा कारखान्यांमध्ये विंधन विहिरी (बोअरवेल) खणण्याची मुभा द्यावी, असे निवेदन केले. मात्र उद्योगमंत्र्यांनी विंधन विहिरींचा प्रस्ताव नाकारला.