पुरवठय़ातील अडचणींमुळे उरण तालुक्यातील आठ गावे तहानलेली

धरणातील पाण्याचे कप्पे सरकल्याने आठ दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

उरण तालुक्यातील पूर्व विभागात असलेल्या जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाच्या पुनाडे धरणातून येथील पुनाडे, वशेणी, सारडे, पिरकाने, पाले, गोवणणे, कडाप्पे, आवरे या आठ गावांना पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाण्याचे कप्पे सरकल्याने आठ दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. धरणात पाणीसाठा शिल्लक असला तरी त्याचा पुरवठा करण्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊन पाणीपुरवठा होईल असे मत आठ गाव पाणीपुरवठा कमिटीने व्यक्त केले आहे.
अनेक वर्षे पाण्याच्या टंचाईत काढावे लागल्यानंतर जिल्हा परिषदेचे तत्कालीन सदस्य जीवन गावंड व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पुनाडे धरणातील पाणी आठ गावांना पुरविण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी लोक वर्गणी काढून आठ गाव पाणीपुरवठा कमिटीची स्थापना केली होती. या कमिटीच्या माध्यमातून पाणीपुरवठय़ाची योजना राबवून येथील नागरिकांना दिलासा दिला होता. पुनाडे धरण हे शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी तयार करण्यात आलेले होते. मात्र धरणाला गळती लागल्याने अनेक वर्षे धरणाचा उपयोग होत नव्हता. या धरणातून आठ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. सध्या धरणात पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा होईल इतका पाणीसाठा आहे.परंतु धरणातील पाणी खेचून घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चॅनलमध्ये पाणी येत नसल्याने ही समस्या निर्माण झाल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य व आठ गाव पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष विनोद ठाकूर यांनी दिली आहे. तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अरविंद म्हात्रे यांनी या धरणाला बुधवारी भेट देऊन पाहणी केली. धरणातील पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण झाल्याने तहसील विभागाने या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचीही मागणी करण्यात आलेली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 8 villages facing water scarcity in uran talika