पूनम धनावडे, नवी मुंबई

गुन्ह्य़ांत वाढ, २०० सुरक्षा रक्षकांवर भिस्त; सीसीटीव्ही यंत्रणेचा अभाव

एपीएमसी बाजाराच्या आवारात लूटमार, चोरी, अवैध व्यवसाय, गांजा विक्रीच्या गुन्ह्य़ांत दिवसागणिक वाढ होत आहे. यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान बाजार परिसरात विविध प्रकारचे एकूण ३३ गुन्हे घडले. हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत अधिक आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजाराच्या १७० एकर परिसरातील सुरक्षेची धुरा अवघ्या २०० सुरक्षा रक्षकांच्या खांद्यावर आहे. बाजारात प्रशासनाकडून साधे सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गुन्ह्य़ांचा छडा लावण्यात अडथळे येत आहेत. मार्केटमध्ये सुरक्षा रक्षक तेसच व्यापारी असोसिएशनच्या अंतर्गत काही ठिकाणी सीसीटीव्ही आहेत. मात्र एपीएमसी बाजाराचा विस्तार पाहता, ही सुरक्षा पुरेशी नाही.

एपीएमसीमध्ये फळ, धान्य, भाजीपाला, मसाला, कांदा-बटाटा असे सर्व प्रकारचे बाजार आहेत. या बाजारांमध्ये दररोज जवळपास ६ हजार गाडय़ा वेगवेगळ्या ठिकाणांहून येतात. वेगवेगळ्या प्रतीच्या मालाची येथे खरेदी-विक्री केली जाते. बाजाराच्या आवारात ३७०० गोदामे, १५०० व्यावसायिक गाळे, ४ मोठे लिलाव हॉल, ५ मोठे घाऊक मार्केट यार्ड आहेत. एवढय़ा मोठय़ा बाजार समितीची सुरक्षेची भिस्त केवळ २०० सुरक्षा रक्षकांवर सोपविण्यात आली आहे.

बाजारात रोज हजारोंच्या संख्येने वाहने येतात. वाहन चोरी, जबरी चोरी, लूटमार, वाहन मोडतोड, वाहनांचे सुटे भाग चोरणे अशा घटनांत वाढ झाली आहे. जानेवारी ते मे २०१८ या कालावधीत वाहनांची मोडतोड करून चोरी केल्याचे २१ गुन्हे घडले आहेत. महिनाभरापूर्वी मसाला बाजाराच्या आवाराबाहेर मोठय़ा गटारात अज्ञात व्यक्तीच्या हाडांचा सांगाडा आढळला होता. एपीएमसी हा अवैध गांजा विक्रीचा अड्डाच बनला आहे. वारंवार कारवाई होऊनही गुन्हे कमी होत नाहीत.

अग्निसुरक्षा वाऱ्यावर

पाच बाजारांच्या परिसरात कुठेही अग्निशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नाही. सर्वच बाजारांत मोठय़ा प्रमाणात शेतमाल येतो. विशेषत: भाजीपाला आणि फळ बाजारात अधिक धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या परिसरात कागदी खोके, लाकडी पेटय़ा, गवत इत्यादींचे प्रमाण अधिक असते. त्याला आग लागल्यास मोठी दुर्घटना घडेल, अशी भीती व्यक्त होत आहे. हे बाजार सिडकोने उभारले असून त्या इमारती आता जुन्या झाल्या आहेत. भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय अग्निशमन यंत्रणा बसविता येत नाही, तरीही प्रशासन पातळीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती, बाजार समिती प्रशासनाने दिली.

अपुऱ्या निधीमुळे एपीएमसीत सीसीटीव्ही बसविण्यात अनेक अडथळे येत आहेत. खासदार निधीतून ५० लाखांची तरदूत झाली आहे. त्यापैकी २५ लाख रुपयांच्या निधीतून भाजीपाला आणि फळ बाजारात सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत.

शिवाजी पाहिनकर, सचिव, एपीएमसी