उरण तालुक्याची वाढती लोकसंख्या, वाहने व औद्योगिकीकरण यामुळे अपघातांच्या घटनांतही वाढ झालेली असून आपत्कालीन व्यवस्था नसल्याने अनेकांना पनवेल, नवी मुंबई व मुंबईत उपचार घेण्यासाठी जात असतानाच आपला जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे उरणमध्ये शंभर खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारावे तसेच अपघातग्रस्तांवर तातडीने उपचार करण्यासाठी ट्रॉमा सेंटर करा अशी मागणी उरणमधील विविध संघटनांकडून केली जात होती. ती पूर्ण होत असून उरणमधील शासकीय रुग्णालयासाठी सिडकोकडून दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती उरणचे आमदार मनोहर भोईर यांनी दिली आहे. या रुग्णालयाचे लवकरच भूमिपूजन करण्यात येणार आहे.
सव्वादोन लाख लोकसंख्या व दररोज उरणमध्ये नोकरी, उद्योग किंवा व्यवसायानिमित्ताने ये -जा करणारे ६० हजार प्रवासी अशा अडीच ते तीन लाख लोकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. यासाठी उरण शहरात ३० खाटांचे रुग्णालय आहे. त्यापैकी निम्म्या खाटा या महिलांसाठी राखीव आहेत. तसेच रुग्णालयात आपत्कालीन व्यवस्था तसेच इतर सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे उरणमधील नागरिकांसाठी शासकीय रुग्णालयाची सोय करण्यात यावी अशी मागणी विविध राजकीय पक्ष, उरण सामाजिक संस्था यांनी वारंवार केली होती. त्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. याचा पाठपुरावा उरणचे माजी आमदार विवेक पाटील यांनीही केला होता. त्यानंतर आमदार मनोहर भोईर यांनी पाठपुरावा करीत राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना उरणमध्ये सिडकोकडून देण्यात येणाऱ्या भूखंडाची पाहणी करण्यात आली होती. या शासकीय रुग्णालयासाठी शासनाने ८४ कोटींचा निधी मंजूर केला आहे. तर रुग्णालयाच्या उभारणीसाठी सिडकोकडून १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर तातडीने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रुग्णालयाचे भूमिपूजन केले जाणार असल्याची माहिती भोईर यांनी दिली.