एकावेळी पाच-सहा प्रवासी; वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष

नवी मुंबईत रिक्षाचालकांकडून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक अनेक ठिकाणी सुरू आहे. एकावेळी पाच ते सहा प्रवासी घेतल्याशिवाय रिक्षाचालक गाडीच हलवत नाही. हा प्रकार सर्रास सुरू असताना वाहतूक पोलीस मात्र याकडे डोळेझाक करताना दिसत आहेत.

वाशी ते कोपरखैरणे, नेरुळ स्थानक ते उलवा, वाशी बसस्थानक ते तुर्भे नाका, तुर्भे स्टोअर, घणसोली स्थानक ते घणसोली गाव, कोपरखैरणे ते महापे, घणसोली स्थानक ते महापे, तसेच ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, तुर्भे, रबाळे स्थानकांतून औद्योगिक वसाहतीत शेअर रिक्षा चालतात. यात औद्योगिक वसाहतीत सकाळी ९ ते ११ व संध्याकाळी ६ ते साडेसात दरम्यान मोठय़ा प्रमाणात शेअर वाहतूक होत असते. या सर्व मार्गावर ‘एनएमएमटी’ वा ‘बेस्ट’ बस सेवा सक्षम नसल्याने रिक्षा वाहतूक होत असते.

मात्र तीन आसनी रिक्षात बहुतांश ठिकाणी चार प्रवासी घेतले जातात. मात्र औद्योगिक वसाहत आणि घणसोली स्टेशन ते घणसोली गाव, नेरुळ स्टेशन ते उलवा या ठिकाणी सहा-सहा प्रवासी कोंबून वाहतूक केली जात आहे.

किमान पाच प्रवासी बसल्याशिवाय रिक्षा हलवलीच जात नाही. बसची व्यवस्था नाही. थेट रिक्षा करायची तर परवडत नाही. त्यामुळे प्रवासीही याला पाठबळ देत आहेत.

नियमाप्रमाणे रिक्षात तीन प्रवासी व एक चालक असे चार जण बसू शकतात. मात्र सर्रास क्षमतेपेक्षा अधिकची बेकायदा वाहतूक सुरू आहे. हा सर्व प्रकार वाहतूक पोलिसांच्या समोर सुरू असताना कोणतीही कारवाई केली जात नाही.

यावर्षी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असलेल्या ४ हजार ८३ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ५ लाख ८२ हजार ४०० रुपयांची दंडवसुली करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

कारवाई करणार

अशा प्रकारे वाहतूक करणे बेकायदाच असून ठोस कारवाई केली जाईल. प्रवाशांनीही तीनपेक्षा जास्त बसू नये. जादा प्रवासी घेतल्याशिवाय रिक्षाचालक जात नसेल तर कंट्रोल रूम वा वाहतूक पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त  सुनील लोखंडे यांनी केले आहे.