उद्योजक- संजय मेहता

फर्निचर विक्रीचा घरगुती व्यवसाय सांभाळतानाच रत्नाकर पटवर्धन यांना औषधनिर्मितीसाठी यंत्रे तयार करण्याची संधी मिळाली. कोणतीही पाश्र्वभूमी नसताना त्यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांच्या आर. पी. प्रॉडक्ट्स या कंपनीची यंत्रे आज देश-विदेशांतील औषधनिर्मिती कारखान्यांत धडधडत आहेत.

औषध निर्मितीसाठी आवश्यक असणारे विविध घटक एकमेकांत मिसळण्यासाठी गरज असते ब्लेंडिंग यंत्राची. देश-विदेशातील औषधनिर्मिती कंपन्यांना हे यंत्र पुरवणाऱ्या विश्वासार्ह कंपन्यांमध्ये आर. पी. प्रॉडक्ट्सने स्थान मिळवले आहे. रबाळे एमआयडीसीत या कंपनीचा कारखाना आहे. औषधनिर्मितीत अचूकतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या उत्पादनात ही अचूकता टिकवून ठेवण्यात आर. पी. प्रॉडक्ट्स यशस्वी ठरले आहे. साताऱ्याच्या पटवर्धन पिता-पुत्रांच्या या कंपनीची यंत्रे भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, अफ्रिका आणि आखाती देशांतील औषधनिर्मिती कंपन्यांतही धडधडत आहेत.

आर. पी. प्रॉडक्ट्सची स्थापना केली रत्नाकर पटवर्धन यांनी. एका अभियांत्रिकी कारखान्यात १० वर्षे काम केल्यानंतर त्यांनी स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. १९८६ मध्ये अंधेरी येथे ८३६ चौरस फूट क्षेत्रफळाच्या कारखान्यात आर. पी. प्रॉडक्ट्सचे काम सुरू झाले. या कारखान्यासाठी मिळालेली पहिली ऑर्डर हा एक मोठा योगायोग होता. उत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पटवर्धन कुटुंबीय घर व ऑफिससाठी लागणाऱ्या फर्निचरची विक्री करत. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात रत्नाकर पटवर्धन यांची एका जर्मन नागरिकाशी ओळख झाली. ते एका बडय़ा कंपनीशी संबंधित होते आणि रेबीज औषधाच्या उत्पादनासाठी भारतात आले होते. गुजरातमधील अंकलेश्वर येथे ही परदेशी कंपनी आपला कारखाना उभारणार असल्याने त्यासाठी लागणाऱ्या यंत्रसामुग्रीचा शोध घेण्याचे काम त्यांच्यावर होते. अशी यंत्रे तयार करू शकाल का, असे त्यांनी रत्नाकर यांना विचारले. रसायनशास्त्राचे पदवीधर असलेल्या पटवर्धन यांचा अभियांत्रिकीशी काहीही संबंध नव्हता, पण अभियांत्रिकी कारखान्यातील अनुभव गाठीशी होता. तिथे त्यांचा चांगलाच अभ्यास झाला होता. त्या बळावर त्यांनी त्या जर्मन नागरिकाला होकार दिला आणि औषधनिर्मितीसाठी लागणारी यंत्रे तयार करण्याच्या व्यवसायात पाऊल ठेवले.

या संदर्भात अभ्यास करण्यासाठी, त्यातील नवीन संशोधनांविषयी जाणून घेण्यासाठी, कंपनीच्या अपेक्षा समजून घेण्यासाठी त्यांना अनेकदा जर्मनीच्या वाऱ्या कराव्या लागल्या. कंपनीच्या गरजा भागवणारी यंत्रे आर. पी. प्रॉडक्ट्स बनवून देत होते.

५-६ वर्षे हे काम सुरू राहिले, मात्र त्यानंतर त्या कारखान्याला यंत्रांची गरज भासणे बंद झाले आणि जोमाने उभारलेला व्यवसाय अचानक बंद पडला. आता पुढे काय करायचे असा पटवर्धन यांच्यापुढे निर्माण झाला. हा प्रश्नही त्या जर्मन नागरिकानेच सोडविला. त्यांनी पुण्याच्या ‘सिरम इन्स्टिटय़ूट’, ‘मर्क’, ‘नुपिन’ यासारख्या औषधनिर्मिती कारखान्यांशी त्यांचा संपर्क साधून दिला. त्यामुळे ‘आर. पी.’च्या अस्तित्वावरील प्रश्नचिन्ह दूर झाले.

आज देश-विदेशातील ५००हून अधिक औषधनिर्मिती कारखान्यांत ‘आर. पी. प्रॉडक्ट्स’ची यंत्रे बसविण्यात आली आहेत. यात ‘रेड्डी’, ‘अरबिंदू’, ‘सन’, ‘टोरॅन्टो’, ‘कॅडिला’, ‘सॅन्डोज’, ‘सनोफी’ अशा प्रतिथयश कंपन्यांचाही समावेश आहे. या कारखान्यांत एकदा बसवलेली यंत्रे वर्षांनुवर्षे टिकली आहेत. प्रगतिशील कारखान्यांचा उद्योगविस्तार देश-विदेशात करणे ही नित्याची बाब असल्याने अशा १५-२० कारखान्यांशी आर.पी.ने व्यावसायिक नाते प्रस्थापित केले आहे. त्यामुळे कारखान्यातील उत्पादन सातत्याने सुरू आहे.

आर. पी. प्रॉडक्ट्सची धुरा आता दुसरी पिढी सांभाळत आहे. राहुल पटवर्धन गेली १७ वर्षे आर. पी. प्रॉडक्ट्सचे उत्पादन देश-विदेशात पोहचविण्याचे काम करीत आहेत. त्यांनी बी. ई. मेकॅनिकल केले आहे. २००० साली राहुल यांनी शिक्षण पूर्ण करून कारखान्यात प्रवेश केला आणि मुळातच सुनियोजित उद्योगाला चालना दिली.

व्यवसाय विस्तार

* रबाळे एमआयडीसीत १३ भूखंड एकत्र करून देखणा कारखाना उभारण्यात आला आहे. त्यातील तळ व पहिल्या मजल्यावर ब्लेडिंग यंत्रे बनविण्यासाठी ६० कामगार अहोरात्र मेहनत घेत आहेत. चार प्रकारच्या ब्लेंडिंग मशीन येथे तयार केल्या जातात.

* औषध कंपनीला लागणारी यंत्रसामग्री बनवितानाच काळाची पावले ओळखून आणि व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने आर. पी. प्रोडक्ट्सने आता सुरक्षेसाठी आवश्यक यंत्रसामग्रीच्या क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. एका डच कंपनीसाठी ही यंत्रसामग्री बनविण्याची जबाबदारी आर. पी. प्रॉडक्ट्सने स्वीकारली आहे.