नवी मुंबई : करोना साथरोगाच्या काळात गेले वर्षभर विविध पातळीवर करोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका, इतर कर्मचारी, पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी सेविका, अन्न नागरी पुरवठा विभाग, पाणीपुरवठा, घरोघरी जाऊन आरोग्यविषयक काम करणारे कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कोविड योद्ध्यांना सिडकोच्या तळोजा येथील महागृहनिर्मिती संकुलात घरे राखीव ठेवण्याचा निर्णय राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला असून या काळात शहरांची दैनंदिन तसेच वैद्यकीय साफसफाई ठेवणाऱ्या साफसफाई कामगारांचाही या बुक माय सिडको होम या योजनेत विचार केला जाणार असल्याचे समजते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील ही घरे असून कमीत कमी १९ लाख ८४ हजार तर जास्तीत जास्त ३१ लाख ४३ हजार किमतींपर्यंत ही घरे आहेत.

सिडकोच्या वतीने नवी मुंबईत ६५ हजार घरांची महागृहनिर्मिती केली जात आहे. यातील २४ हजार घरांची यापूर्वीच सोडत काढण्यात आलेली आहे. शिल्लक ४१ हजार घरांची विक्री सिडकोला अद्याप करावयाची आहे. गेले एक वर्षे देशात करोना साथीने थैमान घातले आहे. या साथीची दुसरी लाट मागील महिन्यापासून पसरली आहे. गेले वर्षभर या साथीचा शासकीय तसेच वैद्यकीय यंत्रणा सामना करीत आहे. या लढाईत लढणाऱ्या शासकीय निमशासकीय यंत्रणेतील सर्व घटकांना सिडकोची छोटी घरे देण्याचा निर्णय नगरविकास विभागाने घेतला आहे. त्याची घोषणा बुधवारी नगरविकासमंत्री शिंदे यांनी मुंबईत केली आहे. राज्यातील पोलीस, होमगार्ड, अंगणवाडी सेविका, महसूल, अन्न  नागरी, पाणी विभागातील कर्मचारी तसेच या काळात घरोघरी जाऊन वैद्यकीय कार्य करणाऱ्या सर्व घटकांना सिडकोची ही घरे दिली जाणार आहेत. त्यासाठी बुक माय सिडको होम ही योजना राबविण्यात आली आहे.

एकूण ३ हजार ७०५ घरांतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ८४२, अल्प उत्पन्न गटांसाठी १३८१ आणि विशेषत: पोलिसांसाठी अल्प उत्पन्न गटातील १४८२ घरे तळोजा येथे राखीव ठेवण्यात आलेली आहेत. यात पंतप्रधान आवास योजनेतील घरांचाही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात समावेश केला जाणार असल्याने केंद्र व राज्य सरकारचे अनुदान मिळण्यास हे ग्राहक पात्र ठरणार आहेत. यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पहिले घर हे १९ लाख ८४ हजारांपर्यंत असणार असून जास्तीत जास्त या प्रकारातील घर हे २१ लाख ५६ हजाराचे आहे, तर अल्प उत्पन्न गटातील घर हे २७ लाख ९४ हजारांचे तर त्यापेक्षा मोठे ३१ लाख ४३ हजार रुपये किंमत असणार आहे. या सर्व प्रकारांत कोविडकाळात शहर गाव व झोपडपट्टी भागांची साफसफाई कामगारांचाही समावेश करण्यात यावा अशी मागणी केली जात असून सिडको या प्रस्तावाचा विचार करणार आहे. ईडब्ल्यू व एलआयजी घरे घेण्यास ते फारसे राजी होत नसल्याचे यापूर्वी दिसून आले आहे.