नवी मुंबई पालिकेचे नियोजन; सहकार्य कायम ठेवण्याचे नागरिकांना आवाहन

स्वच्छ सर्वेक्षण झाले म्हणून शहराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करण्यात आलेले नाही. वर्षभराच्या स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले आहे. स्वच्छतेविषयीचे कोणते उपक्रम आणि मोहिमा कोणत्या दिवशी आणि कोणत्या महिन्यात राबवाव्यात याच्या नियोजनाची एक दिनदर्शिकाच तयार करण्यात आली आहे. नागरिकांनीही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने यावर्षी प्रथमच स्वच्छ सर्वेक्षणात पहिल्या तीन क्रमांकात येणाऱ्या महाराष्ट्रातील शहरांना २० कोटी, तर चौथ्या ते दहाव्या क्रमांकात येणाऱ्या शहरांना १५ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे. त्यामुळे नवी मुंबई पहिल्या तीन क्रमांकांत येऊन २० कोटींचे बक्षीस मिळवणार का याबाबत आता सर्वानाच उत्सुकता आहे. दुसरीकडे शहरात कायमच स्वच्छता राहावी यासाठी आयुक्तांनी शहर स्वच्छतेचे वर्षभराचे नियोजन केले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान करण्यात आलेले प्रयत्न यापुढेही नेटाने सुरू ठेवण्यात येतील, असे आयुक्तांनी सांगितले.

वार्षिक नियोजन

  • ९ ते १२ एप्रिल – स्वच्छताविषयक जागतिक परिषद. पुनप्र्रक्रिया (रिसायकल), कचरा कमी करणे (रिडय़ूस) आणि पुनर्वापर (रियुझ) या तीन ‘आर’ची अंमलबजावणी. ‘शून्य कचरा’ मोहीम.
  • १ मे – कामगार दिनानिमित्त ‘स्वच्छता कर्मचारी व स्वच्छाग्रही’ ही संकल्पनेटी अंमलबजावणी
  • ५ जून – पर्यावरण दिनानिमित्त ‘निर्मितीच्या ठिकाणीच कचरा वर्गीकरणा’संदर्भात व्यापक जनजागृती
  • १४ जुलै – आंतरराष्ट्रीय सहकार दिवसानिमित्त ‘सहकारी गृहनिर्माण संस्थांतील स्वच्छता’ या संकल्पनेविषयी जनजागृती. स्वच्छता शपथ. सोसायटय़ांमधील सफाई कर्मचाऱ्यांच्या सुविधांवर भर.
  • १२ ऑगस्ट – युवादिनी तरुणाईचा सहभाग वाढवणारे उपक्रम. महाविद्यालयांतून स्वच्छता उपक्रम.
  • २७ सप्टेंबर – पर्यटनदिनी पर्यटनस्थळांची स्वच्छता. तिथे स्वच्छता संदेशाचे फलक.
  • ऑक्टोबर – स्वच्छ भारत मिशनला चार वर्षे पूर्ण होत असल्याने स्वच्छता कार्यक्रम. स्वच्छतेची चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
  • १९ नोव्हेंबर – जागतिक शौचालयदिनी ‘सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता आणि उपलब्धता’ याविषयी मोहीम.
  • ५ डिसेंबर – आंतरराष्ट्रीय मृदादिनी खत मोहीम राबवण्यात येईल. मोठय़ा सहकारी संस्था, हॉटेलांमध्येही जनजागृती केली जाईल.
  • जानेवारी २०१९ – सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या वापराविषयी प्रबोधन
  • ४ फेब्रुवारी – ४ फेब्रुवारीचा जागतिक कर्करोग दिन व ११ फेब्रुवारीचा जागतिक रुग्ण दिन विचारात घेऊन फेब्रुवारीत रुग्णालयांत व दवाखान्यांत स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल.
  • २२ मार्च – जागतिक जल दिनानिमित्त सर्व जलस्रोतांची, खाडी किनारे व धारण तलावांची स्वच्छता करण्यात येईल.

स्वच्छ शहर सर्वेक्षणात सहभागी झालेल्या सर्व शहरांचे सर्वेक्षण नुकतेच पूर्ण झाले आहे. आपले शहर कितव्या क्रमांकावर येणार, याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. सर्वेक्षणानिमित्त करण्यात आलेली स्वच्छता अशीच टिकवून ठेवण्यासाठी पालिकेने नियोजन केले आहे. ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’द्वारे अस्वच्छ ठिकाणांची रोज सरासरी ३०० छायाचित्रे अ‍ॅपवर येतात. आवश्यक ठिकाणी स्वत: जाऊन पाहणी करत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाबरोबरच नागरिकांनीही आपले शहर नेहमीच स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे.

रामास्वामी एन., आयुक्त, नवी मुंबई महापालिका