शहरातील मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात राहावी यासाठी वर्षांला एक कोटी ८५ लाख रुपये खर्च करणाऱ्या नवी मुंबई पालिकेला अद्याप या समस्येवर नियंत्रण मिळविता आलेले नाही. स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी सरसावलेल्या पालिकेच्या स्वच्छ नवी मुंबई अभियानाला हरताळ फासला जात आहे. पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

नवी मुंबईत २००७ मध्ये केलेल्या पशु गणनेनुसार मोकाट कुत्र्यांची संख्या ३५ हजार होती. पालिकेने केलेल्या काही ठोस उपाययोजनांमुळे २०१५ मध्ये ही संख्या सहा हजारांनी कमी होऊन २९ हजारांवर स्थिरावली. त्यानंतर शहरातील पशुधनाची गणना झालेली नाही. त्यामुळे २०१८ मध्ये ही संख्या सर्वसाधारपणे २४ ते २५ हजारांपर्यंत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

मोकाट कुत्र्यांना पकडणे, त्यांची वाहतूक करून निर्बीजीकरण केंद्रापर्यंत नेणे, चार दिवस त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करणे आणि पुन्हा त्यांना पकडलेल्या ठिकाणी आणून सोडणे यावर पालिका दरवर्षी एक कोटी ८५ लाख रुपये खर्च करते, हे काम तीन वर्षांकरता दिले जात असल्याने साडेपाच कोटी रुपयांची ही निविदा नुकतीच मंजूर करण्यात आली, मात्र शहरातील मोकाट कुत्र्याची संख्या म्हणावी तेवढी कमी झालेली नाही.

मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी तुर्भे येथील कचराभूमीचा काही भाग देण्यात आला आहे. तेथील अस्वच्छता, दरुगधी यामुळे कर्मचारी टिकत नाहीत. केंद्रासाठी शहरात जागा देण्यास रहिवाशांचा विरोध असल्याने हे अद्ययावत केंद्र निर्माण होऊ शकलेले नाही.

स्वच्छ नवी मुंबईसाठी अनेक उपाययोजना केल्या जात असून पाळीव कुत्रे पाळणाऱ्यांना दंड आकारला जात आहे, पण २५ हजारांपेक्षा जास्त मोकाट कुत्र्यांवर पालिकेला उपाययोजना करता आलेल्या नाहीत. याचा त्रास सफाई कामगारांना सहन करावा लागत आहे. हे कामगार दिवसभर साफसफाई करू शकत नाहीत. त्यामुळे रहिवाशांना दरुगधी सहन करावी लागते. मोकाट कुत्रे वर्षांला १३ हजारांपेक्षा जास्त रहिवाशांना चावे घेत आहेत.

नवी मुंबई पालिकेच्या वतीने मोकाट कुत्र्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळेच आज शहरात पिल्ले फारशी दिसत नाहीत. मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी कालबद्ध कार्यक्रम घेऊन उपाययोजना करावी लागेल. जागेची समस्या आजही कायम आहे.

डॉ. वैभव झुंजारे, पशुवैद्यकीय अधिकारी, नवी मुंबई पालिका