जुन्या निष्ठावंतांना आशा
गेली दोन दशके सहमतीच्या राजकारणामुळे विधान परिषदेचे उपसभापतीपद कायम राखलेल्या वसंत डावखरे यांनी शिवसेनेशी असलेल्या मैत्रीचा हवाला देत आपण पुन्हा या पदासाठी उत्सुक असल्याचे संकेत दिलेले असतानाच शिवसेनेतूनही या पदासाठी उत्सुक असलेल्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधान परिषदेच्या या जागेसाठी आपली वर्णी लागावी, यासाठी माजी संपर्कप्रमुख अनंत तरे, रवींद्र फाटक गेली अनेक वर्षे शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे गोपाळ लांडगे यांच्याबरोबरीनेच अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनीही इच्छा प्रदर्शित केली आहे. थोडक्यात विधान परिषद निवडणुकीचा ‘डाव’ रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
राज्यातील युतीच्या राजकारणात तब्बल दोन दशकांहून अधिक काळ लहान भावाची भूमिका बजाविणाऱ्या भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सेनेला मागे टाकत मोठय़ा भावाची जागा पटकावली. शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे शहर मतदारसंघात रवींद्र फाटक यांचा तर कल्याण पूर्वमध्ये गोपाळ लांडगे यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून सेना-भाजपमध्ये विस्तवही जात नाही. त्यानंतर झालेल्या अंबरनाथ, बदलापूर तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये या प्रामुख्याने सेना विरुद्ध भाजप अशीच लढत झाली. या तिन्ही निवडणुकांमध्ये सेनेने भाजपवर मात करीत विधानसभा निवडणुकीतील पीछेहाटीचे उट्टे काढण्याचा प्रयत्न केला.
आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने गोपाळ लांडगे आणि रविंद्र फाटक राजकीय पुनर्वसन होण्याच्या प्रयत्नात आहेत, तर जुने निष्ठावंत म्हणून अनंत तरे यांनीही विधान परिषदेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या या ठाणेकर शिलेदारांबरोबरच अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनीही विधान परिषदेसाठी आपण उत्सुक असल्याचे जाहीर केले आहे. सुनील चौधरी हे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक मानले जातात. अंबरनाथ पालिका निवडणुकीत भाजपने फार मोठे आव्हान उभे केले असताना शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पालकमंत्रीपद शिवसेनेकडे असताना विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंना सोडणे शिवसेनेला राजकीयदृष्टय़ा जड जाणार आहे. त्यामुळे एकूणच विधान परिषदेसाठी कुणाचे ‘डाव’खरे होणार, याविषयी उत्सुकता कायम आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competition in shiv sena for legislative council post
First published on: 26-04-2016 at 04:34 IST