वृद्धाश्रमातील ६० पैकी ५८ जण बाधित

पनवेल : चाचणीनंतर २५ टक्के करोनाग्रस्त आढळत आहेत. तर तळोजातील एका निराधार वृद्धाश्रमातील ६१ पैकी ५८ जण बाधित झाले आहेत. त्यामुळे करोना संसर्ग शहरात झपाट्याने पसरत आहे. याबाबत पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी चिंता व्यक्त केली आहे.

लक्षणे आढळल्यास किंवा करोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तातडीने करोनाची चाचणी नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन किंवा वैद्यकीय मोबाइल व्हॅनला कळवून करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

पनवेल पालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या वाढत असून प्रत्येक चार व्यक्तींच्या करोना चाचणीमध्ये एकास लागण होत असल्याची धक्कादायक स्थिती पनवेलमध्ये आहे. तळोजा परिसरातील निराधार वृद्धाश्रमात ६१ पैकी ५८ जणांना

करोनाची लागण झाली असून यातील १४ जण कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्णांची पालिका काळजी घेत आहे. मात्र या प्रकारामुळे शहरात करोना संसर्ग किती झपाट्याने पसरत आहे, हे लक्षात येते.

अस्थपनांना टाळे लावण्याचे आदेश

सरकारी यंत्रणा दिवसरात्र करोनाविरुद्धच्या लढ्यात काम करत असताना व्यावसायिक सामाजिक अंतर व मुखपट्टीचा नियम पाळत नसल्यास त्यांच्या व्यवसायांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा आयुक्त देशमुख यांनी दिला.

खारघरमध्ये घरापर्यंत वैद्यकीय सेवा

खारघरमधील रुग्णसंख्या जास्त असल्याने तेथे चार वैद्यकीय मोबाइल व्हॅन ठेवल्या आहेत. पालिकेच्या इतर परिसरात सहा वैद्यकीय मोबाइल व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांना घरापर्यंत वैद्यकीय सेवा दिली जात आहे. पालिकेने ६००० रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीसाठी कंपनीकडे मागणी केली आहे.