पनवेल : पत्नीची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी करोनाबाधित असल्याने त्यांना कोन गावातील इंडिया बुल्सच्या करोना काळजी केंद्रात ठेवण्यात आले होते. या आरोपीने बुधवारी दुपारी केंद्रातच आत्महत्येचा प्रयत्न केला.

करोनाबाधित झाल्यावरही उपचारासाठी न नेता पत्नीने घराच्या सज्जात विलगीकरण करून ठेवले. यातून वाद झाल्याने रागापोटी पतीने पत्नीच्या डोक्यात कोयत्याने प्रहार करून खून केला होता. पनवेल तालुक्यातील करजांडे येथे ही घटना घडली होती. संतोष पाटील असे आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र करोनाबाधित असल्याने त्याला पनवेल पालिकेच्या इंडिया बुल येथील करोना काळजी केंद्रात ठेवण्यात आले होते. या इमारतीला पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

बुधवारी आरोपी संतोष पाटील हा या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून नजर चुकवून चौदाव्या मजल्यावर गेला. तेथील शौचालयातून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो एक एक मजला खाली येत असताना काही तासानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सध्या या केंद्रात १२८ हून अधिक करोनाबाधित आहेत. या रुग्णांना या ठिकाणी दक्षता म्हणून ठेवण्यात आले आहेत.