नवी मुंबईकरांपुढे प्रश्न; छाटलेल्या फांद्या पदपथांवर पडून

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झाडांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या आणि धोकादायक स्थितीत असलेल्या फांद्या छाटण्याचे काम पालिकेच्या उद्यान विभागाने पावसाळ्याच्या सुरुवातीला केले खरे; मात्र छाटलेल्या फांद्या उचलण्यासाठी पालिकेला अद्याप वेळ मिळालेला नाही. शहराच्या अनेक भागांत अद्याप या फांद्या पदपथांवरच पडलेल्या आहेत. त्यामुळे पदपथांना कचराकुंडय़ांचे रूप आले आहे. पदपथांवरून चालणे अशक्य झाले आहे.

अनेक दिवसांपासून पदपथांवर पडून असलेल्या या फांद्या आणि पालापाचोळा पावसामुळे कुजला आहे. त्यातून दरुगधी येत आहे. दर वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातील शहरातील रस्त्यालगतच्या वृक्षांच्या अस्ताव्यस्त वाढलेल्या फांद्या छाटणीचे काम पालिकेच्या उद्यान विभागामार्फत हाती घेतले जाते. सोसायटीतील झाडांच्या फांद्या सोसायटीनेच पालिकेकडून परवानगी घेऊन छाटणे अपेक्षित असते. शहरात नेरुळ, सीवूड्सह आठही विभाग कार्यालयांतर्गत वृक्षांच्या फांद्यांची छाटणी मोठय़ा प्रमाणात करण्यात आली; परंतु नंतर या फांद्या पदपथावरच पडून आहेत. या फांद्या त्या त्या विभागातील सफाई कामगारांनी उचलणे आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वीपर्यंत सोसायटीअंतर्गत झाडांच्या छाटणीसाठी पालिकेकडे काही अनामत रक्कम भरून छाटणीची परवानगी मिळवण्यात येत असे; परंतु आता उद्यान विभागामार्फत अनामत रक्कम न घेता फांद्या छाटणीची परवानगी सोसायटय़ांना दिली जाते.

सोसायटय़ा खासगी कर्मचाऱ्यांकडून फांद्यांची छाटणी करून घेतात; परंतु छाटणी केलेल्या फांद्या एका ठिकाणी गोळा करण्याऐवजी पदपथावर टाकल्या जातात. कधी छाटणी केली, याची माहिती पालिका कर्मचाऱ्यांना नसल्याने त्या बराच काळ तिथेच पडून राहतात, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनीही जबाबदारीने पालिकेला सहकार्याचे आवाहन उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

सोसायटय़ा परवानगी घेऊन त्यांच्या सोयीने फांद्यांची छाटणी करतात. रोज अधिक गाडय़ा लावून ५०-६० टन हरित कचरा उचलला जातो. सोसायटीने फांद्यांची छाटणी केल्यानंतर पालिकेला कळवले पाहिजे. शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनीही योग्य ते सहकार्य करायला हवे.

तुषार पवार, उपायुक्त उद्यान व घनकचरा व्यवस्थापन

पालिकेमार्फत वृक्षांच्या वाढलेल्या फांद्या छाटणीचे काम दर वर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले आहे. काही ठिकाणी ते अजूनही सुरू आहे. छाटणीनंतर पदपथावर पडलेल्या फांद्या तात्काळ उचलण्यात येतील.

भालचंद्र गवळी, साहाय्यक उद्यान अधिकारी

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cutting tree issue nmmc
First published on: 10-08-2017 at 01:36 IST