ग्रामीण व झोपडपट्टी भाग हा कमी पडत असल्याने पहिल्या क्रमांकाला हुलकावणी

नवी मुंबई : कोटय़वधी रुपये खर्च करून केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात सक्रिय भाग घेणाऱ्या नवी मुंबई पालिकेला इंदूर, सुरत या शहरांच्या तुलनेत नागरिकांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याचे आढळून आले आहे. गेली चार वर्षे सातत्याने देशात पहिला क्रमांक पटकविणाऱ्या इंदूरमधील प्रत्येक नागरिक हा इतर सुविधांमध्ये मागे असला तरी स्वच्छतेबाबत जागरूक झाला आहे. त्यामुळे या शहराला पहिला क्रमांक पटकविताना मानांकन कमी पडत नसल्याचे दिसून येत आहे. घनकचरा वर्गीकरणात आजही नवी मुंबईतील ग्रामीण व झोपडपट्टी भाग हा कमी पडत असून इंदूरमध्ये हे काम प्रत्येक नागरिक हिरिरीने करीत आहे.

नवी मुंबई गेली अनेक वर्षे राज्यात स्वच्छतेबाबत अव्वल आहे. सिडकोने नियोजनबद्ध तयार केलेल्या या शहरात नवी मुंबई पालिकेने चांगली देखभाल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे देशातील चार हजारपेक्षा जास्त शहरांच्या स्पर्धेत गेल्या वर्षी नवी मुंबईला तिसरा क्रमांक मिळालेला आहे. यामुळे हे शहर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. इंदूर व सुरत या दोन शहरांची स्पर्धा करणाऱ्या नवी मुंबईने यंदा पहिला क्रमांक मिळविण्यासाठी कंबर कसली होती. करोनासारखी जीवघेणी साथ असताना स्वच्छ भारत योजनेची मागील वर्षीच्या ऑक्टोबरपासून सुरुवात केली आहे.

या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकाविण्यासाठी पाण्याचा वापर, घनकचरा व्यवस्थापन आणि सौंदर्यीकरण हे तीन निकष महत्त्वाचे असून त्यांना मानांकन दिले जात आहे. पाण्याचा वापर या प्रकारात केंद्रीय नागरी मंत्रालयाच्या पथकाला नवी मुंबईला वगळता आलेले नाही. देशात सांडपाणी प्रक्रिया राबवणारी नवी मुंबई पालिका एकमेव आहे. या शहरातील सांडपाण्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया केली जात असल्याने त्याचा पुनर्वापर केला जात आहे. हे देशातील इतर कोणत्याही शहरात घडताना दिसून येत नाही. त्यामुळे वॉटर पल्स या मानांकनात नवी मुंबई पालिका टिकून राहिलेली आहे मात्र पुढील दोन निकषांत पालिका मागे पडत असून यात जनतेचा प्रतिसाद या प्रकारात नवी मुंबईकर उदासीन असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

केंद्रीय पथकाकडून नवी मुंबईतील जनतेला अचानक दूरध्वनी करून शहरातील स्वच्छतेबाबत प्रश्न विचारले जातात पण त्याला चांगला प्रतिसाद लाभत नाही. याउलट इंदूरमधील जनता आवर्जून त्यांच्या शहरातील स्वच्छतेबाबत समाधान व्यक्त करीत असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबई हे एक

बेड सिटी शहर आहे. त्यामुळे या शहराबद्दल आपुलकी कमी असून इंदूर हे एक ऐतिहासिक शहर असल्याने तेथील जनता शहराबद्दल जागरूक असल्याचा फरक दिसून आला आहे.

शहर आपलेसे वाटत

नवी मुंबईतील ग्रामीण भागातील जनतेला या स्वच्छ भारत अभियानाविषयी काहीही देणे घेणे नाही असा आव आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील नागरिकाची स्वच्छतेबाबत भिन्न मते आहेत. झोपडपट्टी भाग हा ग्रामीण भागापेक्षा जास्त जागरूक आहे तर शहरी भागातील जनतेला हे शहर आपलेसे वाटत नाही असे दिसून आले आहे. त्यामुळे नवी मुंबईला पहिला क्रमांक मिळालाच पाहिजे यासाठी नवी मुंबईकर हिरिरीने पुढाकार घेत असल्याचे आढळून आलेले नाही. लोकांच्या प्रबोधनावर पालिका लाखो रुपये खर्च करीत असून अठरापगड जातीच्या या शहरात शहाराविषयी आपलेपणा नसल्याने हा विरोधाभास कायम राहणार असल्याचे पालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.