महिनाभरात २३४ संशयित तर आठ बाधित रुग्ण; डासांच्या १०८ ठिकाणांचा शोध

नवी मुंबई : करोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असताना शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. गेल्या महिनाभरापासून शहरात डेंग्यू रुग्णांत लक्षणीय वाढ झाली आहे. दोन महिन्यांत ३६३ तर एका स्पटेंबर महिन्यात २३४ संशयित रुग्ण आढळले असून आठ जण बाधित झाल्याचे महापालिकेने दिलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. असे असले तरी ही संख्या शहरात मोठी आहे.

दरम्यान, उशिरा जाग आलेल्या महापालिका प्रशासनाने शहरात डास उत्पत्ती केंद्रांचा शोध सुरू केला असून यात १०८ ठिकाणे सापडली आहेत. यात गावठाण भागात ही उत्पत्ती केंद्रे जास्त आहेत. स्वच्छ भारत अभियानात प्रथम येण्यासाठी काम करणाऱ्या महापालिकेतील हे चित्र चिंतनीय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गेली दीड वर्षे करोना प्रादुर्भावाला नागरिक तोंड देत आहेत. दिवाळीनंतर शहरात करोना रुग्ण वाढीची भीती व्यक्त होत होती, मात्र अद्याप तरी करोना रुग्णसंख्या स्थिर आहे. एकीकडे हा दिलासा असताना शहरात साथीचे आजार पसरले आहेत. ताप, अशक्तपणा जाणवत असल्याने रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढली आहे.

गेल्या आठवडय़ात याबाबत महापालिका प्रशासनाकडे माहिती मागितली असता त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली होती. मात्र आता प्रशासनाने डेंग्यू रुग्णांची माहिती दिली आहे. साधारण पावसाच्या दिवसांत साथीचे आजार वाढत असतात. गेल्या वर्षी शहरात ऑगस्ट व स्पटेंबर या दोन म्हन्यात डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या ही १४७ इतकी होती. तर आता गेल्या दोन महिन्यांत यात मोठी वाढ झाली असून ती ३६३ वर पोहोचली आहे. यात ऑगस्ट महिन्यात फक्त ५४ संशयित होते. मात्र स्पटेंबर महिन्यात यात लक्षणीय वाढ झाली असून महिनाभरात २३४ संशयित रुग्ण सापडले असून यात आठ जणांना डेंग्यू झाल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले आहे.

डेंग्यू रुग्णांत लक्षणीय वाढ होत असल्याने महापालिका प्रशासनाने शहरातील ३८ हजार ८५६ ठिकाणी पाहणी केली. यात १०८ ठिकाणी डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे समोर आले आहे. गावठाण विभागात ही उत्पत्ती केंद्रे अधिक आहेत. या ठिकाणी एका मजल्याावर चार चार मजले बांधकाम करण्यात आले असून तेथे घरातील साठलेल्या पाण्यात ही डास उत्पत्ती केंद्रे आढळली आहेत. त्याचबरोबर इमारती, औद्योगिक परिसरातदेखील डेंगी अळी डास आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

साथीचे आजारांचे रुग्ण वाढत असताना महापालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी मात्र याबाबत माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत. आरोग्य विभागालाही माहिती न देण्याचे सूचना दिल्या असल्याचे कर्मचारी, अधिकारी सांगत आहेत. 

केंद्रांचे दुर्लक्ष

नागरी आरोग्य केंद्रांतर्फे दरवर्षी घरोघरी जात नागरिकांची तपासणी केली जाते. संशयित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले जातात तसेच औषध फवारणी केली जाते. मात्र अलीकडे यात सातत्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

घरोघरी सर्वेक्षण करून तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र वेळेवर धूर आणि औषध फवारणीच होत नाही. डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. प्रशासनाचे नियोजन नाही.

– शरद पाटील, रहिवासी, तुर्भे