scorecardresearch

कार्बनमुक्त शहराचा निर्धार; ‘एनएमएमटी’च्या ताफ्यातील सर्व वाहने विद्युत अथवा सीएनजीवर

प्रदूषणातील अत्यंत घातक घटक असलेल्या कार्बनचे प्रमाण कमी करण्याचा निर्धार नवी मुबंई पालिकेने केला असून त्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू आहेत.

विकास महाडिक
नवी मुंबई : प्रदूषणातील अत्यंत घातक घटक असलेल्या कार्बनचे प्रमाण कमी करण्याचा निर्धार नवी मुबंई पालिकेने केला असून त्या दृष्टीने विविध उपाययोजना सुरू आहेत. यातील पालिका वापरत असलेली वाहने तसेच एनएमएमटीच्या ताफ्यातील सर्व वाहने ही विद्युत अथवा सीएनजी इंधनावरील करण्यात येत आहेत. त्याबरोबरच सौर ऊर्जा प्रकल्प, एलईडी दिव्यांचा वापर, सांडपाणी पुनर्वापर आणि मियावॉकी तंत्रज्ञानाने विकसित करण्यात येणारी वृक्षसंपदा असे अनेक उपाय सुरू करण्यात आले आहेत.
पुढील अर्थसंकल्प हा कार्बन क्रेडिट निर्माण करणारा असून या वर्षांपासून कार्बन ऑडिट सुरू करण्यात आले आहे.
मुंबई पालिकेने २०५० पर्यंत कार्बनमुक्त शहर करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. नवी मुंबई पालिकेने अशा प्रकारची कोणतीही मुदत जाहीर केलेली नाही, पण हे शहर कार्बनमुक्त करण्याचा प्रयत्न विविध मार्गाने केला जात आहे. यासाठी पालिकेने ५ जून (जागतिक पर्यावरण दिन)पासून कार्बन फूट पिंट्र ऑडिट तयार करण्याचा निर्णय घेतला असून यानंतर कार्बन क्रेडिट निर्माण करणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाणार आहे.
पालिकेच्या परिवहन उपक्रमात जास्तीत जास्त विद्युत व सीएनजी वाहनांचा वापर होईल याकडे लक्ष पुरविले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत १८० विद्युत बसगाडय़ा एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल झाल्या असून लवकरच २५ डबल डेकर बसगाडय़ा घेतल्या जाणार आहेत. एनएमएमटीच्या ताफ्यात असलेल्या ५०० बसगाडय़ा या डिझेल इंधनमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
त्याचप्रमाणे खालापूर येथील मोरबे धरणात सौर ऊर्जा प्रकल्प उभारून पालिका अक्षय ऊर्जेचा पुरस्कार करणार आहे. सार्वजनिक वापरातील विद्युत देयकापोटी होणारा अतिरिक्त खर्च यामुळे कमी होणार आहे. याशिवाय पालिका क्षेत्रातील सोडियम व्हेफरचे ३९ हजार दिवाबत्ती बदलून त्याजागी एलईडी विद्युत सेवा बदल केला जात आहे. पालिकेने यापूर्वी सांडपाण्यावर आठ प्रक्रिया केंद्र सुरू केलेली आहेत, मात्र याच सांडपाण्याचा पुनर्वापर करता येईल असे दोन अतिरिक्त प्रकल्प कोपरखैरणे व ऐरोली येथे लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या केंद्रातील प्रक्रियायुक्त पाणी एमआयडीसीतील कारखाने विकत घेणार आहेत. कार्बन क्रेडिटच्या दृष्टीने पालिकेचा हा एक प्रयत्न महत्त्वाचा आहे.
कार्बन क्रेडिट निर्माण करताना प्राणवायू निर्माण करणारी झाडे मोठय़ा प्रमाणात लावण्याचा प्रयत्न केला जात असून कोपरखैरणे येथे वीस हजार वृक्षांचे संर्वधन जापनीज पद्धतीने करण्यात आले आहे. त्यामुळे झाडांचे जंगल तयार होण्यास मदत होत आहे. पामबीचवरील क्वीन नेकलेस परिसरात ८० हजार झाडे लावली जात आहेत. यासाठी मियावॉकी पद्धत अवलंबली जात आहे. अनेक ठिकाणी पालिकेच्या इलू सायकल वापरल्या जात असून याला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
प्रबोधनाची गरज
स्वच्छ भारत अभियानांर्तगत पालिकेने अनेक उपाययोजना करीत स्वच्छतेचा पुरस्कार केला आहे. जास्तीत जास्त ओला सुका कचरा वर्गीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. त्यासाठी गेली सात वर्षे स्वच्छ भारत अभियानाचा नारा सातत्याने दिला जात आहे. कार्बन डायऑक्साइड कमी करणे आणि कार्बन क्रेडिट मिळविणे यासाठी पालिकेला सर्वात अगोदर याचे प्रबोधन करावे लागणार आहे.
पुढील अर्थसंकल्पात नावीन्यपूर्ण प्रकल्प
सार्वजनिक कार्यक्रमाप्रति उदासीनता हे नवी मुंबईकराचे एक वैशिष्टय़ आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानात भाग घेण्यासाठी नागरिकांना अनेक वेळा टोह फोडून सांगावे लागत आहे. कार्बन क्रेडिट म्हणजे काय ते अगोदर साध्या सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. त्यासाठी या विषयावर चर्चा होणे आवश्यक असून पालिका पुढील अर्थसंकल्प हा जास्तीत जास्त कार्बन क्रेडिट निर्माण करणारे प्रकल्प राबविण्यावर असणार आहे.
विकसित देशात कार्बन क्रेडिट कार्डावर जमा होते. त्याचा फायदा तेथील नागरिकांना होत आहे. कार्बन क्रेडिट निर्माण करण्याचा प्रयत्न आजपासून करण्याची आवश्यकता आहे. ग्लोबल वॉर्मिगमुळे तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ होत असून त्याचा फटका सर्वच देशांना बसत आहे. कार्बन डायऑक्साइड निर्माण करणारे प्रकल्प कमी करण्याचा पालिकेचा प्रयत्न राहणार असून यंदापासून कार्बन ऑडिट केले जात आहे. कार्बन फूट पिंट्र किती निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालिका एक निश्चित कार्यक्रम ठरविणार आहे. – अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई पालिका

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Determination carbon free city vehicles nmmt fleet electric cng mumbai municipality amy

ताज्या बातम्या