सफाईनंतर नाले उघडेच

नाल्याजवळच काढून ठेवून नाल्याचे झाकण उघडे ठेवल्याचा फटका कळंबोलीत एका ३२ वर्षीय रहिवाशाला बसला.

चेंबरमध्ये पडून तरुण जखमी
नालेसफाईनंतर कचरा नाल्याजवळच काढून ठेवून नाल्याचे झाकण उघडे ठेवल्याचा फटका कळंबोलीत एका ३२ वर्षीय रहिवाशाला बसला. सेक्टर १७ येथील रोडपाली तळ्याजवळील पदपथावर २० फुटी खोल नाल्यात पडल्याने तो जखमी झाला. प्रकाश असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
सोमवारी दुपारी ही घटना घडली. रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाने प्रकाशला नाल्यात पडताना पाहिले. ही माहिती सिडको अग्निशमन दलाला दिल्यानंतर जवानांनी प्रकाशला बाहेर काढले. कळंबोली पोलिसांनी प्रकाशला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर सिडकोच्या हलगर्जीपणाबद्दल जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला. आठवडाभरापासून सिडकोने नालेसफाईचे काम कळंबोली, कामोठे आणि इतर सिडको वसाहतींत हाती घेतले आहे; मात्र नालेसफाई करणारे कंत्राटदार नाल्यावरील झाकणे त्याजवळील कचरा काढून तो चिखल नाल्याशेजारीच ठेवत आहेत.
सफाईनिमित्त वसाहतींमधील नाल्यावरील सर्व झाकणे उघडी असली तरीही सिडको अधिकाऱ्यांनी नाल्यांवरील झाकणे उघडी नसल्याचा दावा केला आहे.
या घटनेबाबत सिडकोचे अधीक्षक अभियंता किरण फणसे यांनी संबंधित घटनेची चौकशी सुरू असून वसाहतीमधील नालेसफाईचे काम सुरू असल्याचे सांगितले. मात्र कोणत्याही नाल्याचे झाकण उघडे नसल्याचेही फणसे यांनी स्पष्ट केले आहे

केबीनमधून बाहेर पडा, रस्त्यावर येऊन कामे पाहा
कळंबोली येथील नाल्यांवर झाकणे नसल्याने रहिवासी पडल्याचे समजताच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सिडकोच्या कळंबोली येथील कार्यालयात धाव घेतली. मात्र येथील अधिकाऱ्यांना हा प्रकारच माहीत नसल्यामुळे कार्यकर्त्यांचा संताप अनावर झाला. सिडकोचे अधिकारी घटनास्थळावर न पोहोचल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना या नाल्यावर झाकण टाकण्याची वेळ आली. सिडको अधिकाऱ्यांना संतापलेल्या कार्यकर्त्यांनी मोबाइलवरून घटनास्थळाचे फोटो दाखवल्यावर अधिकाऱ्यांनी ही घटना मान्य केली. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी ‘वातानुकूलित दालनात बसून कंत्राटदारांच्या संगनमताने कामे करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात रस्त्यावर कामाची पाहणीसाठी यावे’ अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. मागील तीन वर्षांपूर्वी उघडय़ा गटारांमुळे अनेक लहानगी विद्यार्थी गटारात पडले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Drains reamin open after cleaning