दुर्बल आणि वंचित घटकातील शिशू ते पहिलीच्या वर्गातील पाल्यांसाठी त्यांच्या शहरामधील नामांकित विद्यालयांमध्ये मोफत प्रवेश मिळावा, यासाठी सरकारच्या शिक्षण विभागाने मागील ३ महिन्यांपासून पुढाकार घेऊन २५ टक्के सवलतीचा शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली. त्यामध्ये पनवेलमधील ७६ विद्यालयांमध्ये एक हजार ७७७ अर्ज पालकांना आठवीपर्यंत मोफत शिक्षण घेता येणार आहे. सोमवारी सायंकाळी पालकांच्या मोबाइलवर शिक्षण विभागाचा पाल्याच्या प्रवेशासाठी ३ पैकी कोणतीही एक शाळा निवडण्याचा एसएमएस आल्याने पालकांनी शिक्षण विभागाच्या कारभाराविषयी समाधान व्यक्त केले.
पनवेलमधील ७६ विद्यालयांमध्ये २ हजार १६४ जागांचे प्रवेश निश्चित होणार होते, मात्र एक हजार ७७७ अर्ज पालकांनी केल्याने या प्रवेश प्रक्रियेत आजही ३८७ जागा रिक्त राहिल्या आहेत. रायगड जिल्ह्य़ाचे शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी १ हजार ७७७ अर्जाची सोडत काढण्यात आली असून या सोडतीचा निकाल शिक्षण विभागाने लघुसंदेश (एसएमएस) पालकांच्या मोबाइल फोनवर सायंकाळी पाठविला. प्रत्येक पालकाला दोन किंवा तीन शाळांचा पर्याय शिक्षण विभागाने सुचविला आहे. सोमवारी आलेल्या या एसएमएसमुळे पाल्यांना आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत मिळणार याची खात्री पालकांना वाटू लागल्याने यंदाच्या वर्षी खासगी शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनासमोर या गरीब व वंचित पालकांना शुल्क कमी करण्यासाठी मान खाली झुकवण्याची गरज लागणार नाही याचेही समाधान अनेकांनी व्यक्त केले. पहिल्या सोडतीतील पालकांची प्रवेशाची अंतिम तारीख ५ मे असणार असल्याची माहिती पनवेलचे गटशिक्षणाधिकारी (प्रभारी) नवनाथ साबळे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Education department sms for schools select to children
First published on: 27-04-2016 at 04:16 IST