|| संतोष जाधव

प्रत्येक कर्मचाऱ्याला रोज किमान ५-१० थकबाकीदारांच्या जोडण्या खंडित करण्याचे लक्ष्य 

वीज देयकांची थकबाकी कोटय़वधींच्या घरात पोहचल्याने वाशी मंडल क्षेत्रातील नवी मुंबई, पनवेल शहर, उरण, तळोजा, कामोठे, खारघर या भागांतील थकबाकीदारांवर कारवाईची वीज कोसळली आहे. ज्यांनी दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ वीज देयक भरलेले नाही, अशा ग्राहकांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई करण्याची जबाबदारी जनमित्रांवर आहे. प्रत्येक जनमित्राला रोज किमान ५-१० थकबाकीदारांची वीजजोडणी खंडित करण्याचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. ते पूर्ण न करणाऱ्यांना पगारकपात सहन करावी लागणर आहे. ही मोहीम ३० जूनपर्यंत राबवण्यात येणार आहे. आवश्यकता भासल्यास पुढेही अशीच कारवाई सुरू ठेवण्यात येईल, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कार्यकारी अभियंत्यांनाही त्यांच्या विभागातील थकीत वीज देयक वसुलीचे उदिष्ट देण्यात आले आहे. यापूर्वी थकबाकी वसूल करताना ग्राहकांच्या समस्यांचा सहानुभूतीने विचार केला जात होता. आता मात्र सबबींचा विचार न करता दोन महिन्यांहून अधिक काळ थकबाकी असलेल्या वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांकडून व महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबतच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणात येऊ लागल्या आहेत.

समान्यपणे कार्यकारी अभियंते आपल्या वायरमनच्या मदतीने थकबाकीदारांची महिन्याची यादी करून वीजपुरवठा खंडित करत. परंतु यात महावितरणच्याच कर्माचाऱ्यांकडून भेदभाव केला जात असल्याच्या तक्रारी येऊ लागल्यामुळे मोठय़ाप्रमाणात थकबाकी वसूल करता यावी, यासाठी धडक मोहिम राबवण्यात येत आहे. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत.

पावसाच्या लपंडावामुळे अद्याप घामाच्या धारा थांबलेल्या नाहीत. त्यातच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. भांडूप नागरी परिमंडळात मोठय़ा प्रमाणात थकबाकी आहे. दोन महिन्यापेक्षा अधिक काळाची थकबाकी असल्यास तात्काळ वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. ग्राहकांनी वेळेत देयक भरणे अपेक्षित आहे. तरच चांगली सेवा देता येईल. दिवसाला ५ ते १० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. उद्दिष्ट पूर्ण न केल्यास पगार दिला जाणार नाही.    – विश्वजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी

एक लाख ६४ हजार ग्राहकांचे ५४ कोटी ७८ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. ७० हजार ग्राहकांचे वीजबिल थकीत असल्याने कडक कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई ३० जूनपर्यंत सुरू राहणार आहे. आवश्यकता वाटल्यास त्यापुढे सुरू ठेवली जाईल.   – एस. पी. गायकवाड, प्रभारी अधीक्षक अभियंता, वाशी विभाग

दोन महिन्यांचे वीज देयक थकीत होते. १८ जूनपर्यंत मुदत देण्यात आली होती. तरीही पूर्वसूचना न देता १८ जूनलाच वीजपुरवठा खंडित करण्यात आला.     -जयवंत कुलकर्णी, सीवूड्स

ग्राहक आणि थकबाकी

  • वाशी मंडल क्षेत्रातील वीजग्राहक ९ लाख
  • थकबाकीदार १ लाख ६४ हजार
  • थकबाकी ५४ कोटी ७८ लाख