महावितरणकडून न्हावा येथून समुद्रमार्गे वीजपुरवठा

काळ्या पाषाणांतील लेण्यांमुळे युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या घारापुरी बेटावरील अंधाराचे साम्राज्य मेअखेरीस दूर होणार असल्याचा दावा महावितरणने केला आहे. राज्य सरकारने घारापुरीच्या वीज पुरवठय़ासाठी १५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामासाठी ३१ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी न्हावा ते घारापुरी अशी समुद्राच्या तळातून ‘सबमरिन केबल’ टाकण्याचे काम सुरू आहे. ३१ मे पर्यंत हे काम पूर्ण होईल, असा दावा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे या बेटावरील रहिवाशांचे आयुष्य सुकर होणार आहे.

मुंबई व उरण यांच्या मध्यभागी असलेले घारापुरी बेट हे तेथील महेश मूर्ती आणि शिवलिंगामुळे देशातीलच नव्हे तर जगातील एक मुख्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.  या बेटावर मोरा बंदर, शेतबंदर व राजबंदर अशी एकूण तीन गावे आहेत. साधारण ९५० लोकसंख्या असलेल्या या गावात ३०० घरे आहेत, मात्र आजही त्यांची घरे अंधारात आहेत. याचा परिणाम रहिवाशांच्या राहणीमानावर आणि मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर होत आहे. सध्या ६० टक्क्य़ांपेक्षा अधिक गावकरी मुलांच्या शिक्षणासाठी उरण तालुक्यात राहात आहेत. त्यापैकी बहुतेकांचा उदरनिर्वाह घारापुरी येथे दररोज येणाऱ्या हजारो पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यासाठी त्यांना घारापुरी ते उरण असा जलप्रवास रोज प्रवास करावा लागतो.

घारापुरी बेटावर वीजपुरवठा करण्यासाठी आजवर अनेक योजना आखण्यात आल्या. विविध सरकारांनी सर्वेक्षणेही केली. त्यानंतरही वीज आली नाही, त्यामुळे अवघे दोन तास चालणाऱ्या जनरेटरच्या विजेवर दिवस काढावे लागतात. याची दखल घेत राज्य सरकारने घारापुरीच्या वीजपुरवठय़ासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आणि वीजपुरवठा करण्याची जबाबदारी महावितरणवर सोपवली. त्यासाठी न्हावा येथून समुद्राच्या तळाशी सबमरिन स्वरूपाची केबल टाकून त्यातून हा वीजपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सतीश करपे यांनी दिली. हे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वेगाने काम सुरू असून ते मुदतीत पूर्ण होईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.