नवी मुंबई : करोनानंतर नवी मुंबई महपालिकेच्या आरोग्य सेवांत लक्षणीय वाढ झाली आहे. आतापर्यंत सोनोग्राफी, सीटीस्कॅन या सेवा खासगी संस्थेमार्फत पुरवल्या जात होत्या. तर विविध दुर्धर आजारांच्या तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळांवर अवलंबून राहावे लागत होते. आता या यंत्रणा पालिकेकडे आल्या आहेत. त्यामुळे महागडय़ा तपासण्या आता पालिका रुग्णालयातच मोफत होणार आहेत.
या सेवा खासगी संस्थांमार्फत चालवण्याऐवजी पालिका स्वत: देणार आहे. यासाठी नियोजन सुरू असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.
नवी मुंबई महापालिकेने करोडो रुपये खर्च करून शहरातील माता बाल रुग्णालयांची सार्वजनिक रुग्णालये केली आहेत. मात्र वर्षांनुवर्षे रुग्णालयाच्या या टोलेजंग इमारती फक्त शोभेच्या वस्तू ठरल्या होत्या, परंतु करोनाच्या काळात याच इमारतींच्या सुविधा वाढवून आता खासगी रुग्णालयासारख्या चांगल्या सुविधा मिळू लागल्या आहेत.
आता वाशी येथील पालिका रुग्णालयात स्वत: सिटीस्कॅन सुविधा सुरू करत आहे. आतापर्यंत एका खासगी संस्थेच्या मदतीने पालिका ही सुविधा देत होती, परंतु करोनाकाळात सामाजिक दायित्व फंडातून पालिकेने सिटीस्कॅन यंत्रणा घेतली आहे. ती यंत्रणा वाशी प्रदर्शनी केंद्रात बसवण्यात आली आहे. मात्र करोना परिस्थितीचा आढावा घेत ती वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. वाशी येथील रुग्णालयात रुबी हेल्थ केअरच्या माध्यमातून ही सुविधा देण्यात येत होती.
नवी मुंबई महापालिकेचे वाशी येथे ३०० खाटांचे प्रथम संदर्भ रुग्णालय आहे. याचबरोबर नेरुळ, ऐरोली रुग्णालय करोनाकाळात चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे सिटीस्कॅनसह सोनाग्राफी तसेच महिलांच्या विविध आजारांविषयीचे उपचार व इतर आरोग्यसेवा नागरिकांना मिळणार आहेत.
प्रयोगशाळा लवकरच इतर चाचण्यांसाठी नेरुळ येथील रुग्णालयात पालिकेने प्रयोगशाळेची करोनाकाळत उभारणी केली आहे. ही प्रयोगशाळा शहरात लवकरच निदान व लवकर उपचारासाठी उपयुक्त ठरली आहे. सध्या शहरातील करोना परिस्थती नियंत्रणात आहे. पुढील काळातील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन या प्रयोगशाळेत इतर दुर्धर आजारांच्या तपासण्या सुरू करण्यात येणार आहेत. यापूर्वी पालिकेची स्वत:ची प्रयोगशाळा नसल्याने सामान्य रुग्णांची खासगी प्रयोगशाळेत लूट सुरू होती.
पालिकेच्या अनेक आरोग्य सुविधा खासगी संस्थेमार्फत चालवण्यापेक्षा पालिकेनेच त्या चालवल्या पाहिजेत यासाठी आपण आग्रही आहोत. याबाबत कार्यवाही सुरू आहे. सिटीस्कॅनची सेवा लवकरच पालिकेमार्फत चालवली जाणार आहे. इतरही महागडय़ा सुविधा पालिकेच्या रुग्णालयांतून दिल्या जाणार आहेत. – अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका