नवी मुंबई : महापे औद्योगिक वसाहतीतील अडवली गावानजीक मंगळवारी सकाळी सात साडेसातच्या सुमारास आगीची घटना घडली असून यात अनेक झोपडय़ा तसेच सुमारे १५ झाडे जळून खाक झाली आहेत.
महापे येथील शिळ फाटा रस्त्यावर अडवली भुतवली गावानजीक जंगलात ही आग लागली. याच ठिकाणी भूमिगत डिझेल वाहिनी असून त्यातून गळती झालेल्या डिझेलवर ठिणगी पडून आग लागली. सध्या उन्हाळा असल्याने परिसरातील झाडे वाळलेली असल्याने झाडांनीही पेट घेतला तर जवळच असलेल्या काही झोपडय़ाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. तसेच या परिसरात वखार, गोदामामधील सामान वेळीच हलवल्याने त्याचे फारसे नुकसान झाले नाही. आग विझवण्यासाठी सिडको, कोपरखैरणे, ऐरोली, ठाणे, रबाळे व पावणे एमआयडीसीच्या अग्निशमन गाडय़ा दाखल झाल्या होत्या. आग डिझेलमुळे लागल्याने आग विझवूनही पुन्हा पुन्हा आग लागत असल्याने अखेर फोम मारून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.
३८ अधिकारी कर्मचारी सलग पाच तास प्रयत्न करीत होते, अशी माहिती रबाळे एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी रायबा पाटील यांनी दिली. या ठिकाणाहून डिझेलची भूमिगत वाहिनी असून या वाहिनीतील डिझेल गळती होऊन येथील नाल्यापर्यंत ते झिरपले होते. याच ठिकाणी कोणीतरी पेटती काडी, सिगारेट-बिडीसारखी वस्तू टाकली असावी आणि त्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
आग विझवताना बेकायदा झोपडय़ा, गोदाम आणि गाळे यामुळे अडथळे निर्माण होत होते, अशी माहिती एका अग्निशमन जवानाने दिली. आग विझवण्याबरोबरच येथील सामान आणि वस्ती हलवणे यालाही मनुष्यबळ खर्ची पडत होते.
डिझेलची चोरी आणि गळती
येथे भूमिगत असलेली डिझेल वाहिनी ही मुंबई दिल्ली असून भारत पेट्रोलियम कंपनीची आहे. आगीची घटना कळल्यावर त्यांचीही रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली होती. त्यांनी पाहणी केली असता अज्ञात व्यक्तीने डिझेल वाहिनीला छिद्र करून डिझेल चोरी करत असल्याचे निदर्शनास आले याच छिद्रातून डिझेल थेंब थेंब झिरपत होते जे नजीकच्या नाल्यापर्यंत पोहचले होते त्यामुळे आग विझवण्यास पाण्याऐवजी फोमचा मारा करावा लागला.