शेखर हंप्रस
नवी मुंबई : गेली दहा वर्षे विविध कारणास्तव रखडलेले कोपरखैरणे व सानपाडा पोलीस ठाण्याच्या इमारती आता उभ्या राहणार आहेत. कोपरखैरणेतील काम सुरू झाले असून सानपग येथील काम लवकरच सुरू होणार असून हे पोलीस ठाणे राज्यातील सर्वात अद्ययावत व सुसज्ज असे असणार आहे.
याशिवाय तुर्भे आणि तळोजा पोलीस ठाण्याच्या इमारतींसाठीही पाठपुरावा सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त अभिजित शिवथरे यांनी सांगितले.नवी मुंबई राज्यात सर्वात सुरक्षित शहर मानले जाते. शहरात सर्वात कमी गुन्हेगारी आणि गुन्हे उकल टक्केवारी सर्वाधिक आहे. राज्य पोलिसांचे हेल्प लाइन सरोवर नवी मुंबईतील महापे येथे कार्यरत झाले आहे. आता लवकरच राज्यातील अद्ययावत पोलीस ठाणे नवी मुंबईत साकारण्यात येणार आहे.
सानपाडा पोलीस ठाणे पामबीच मार्गावर होत असून पाच मजल्यांची ही इमारत आहे. मोराज सर्कलसमोर सुमारे २ हजार चौरस मीटरचा भूखंड नऊ वर्षांपूर्वी सिडकोने पोलीस विभागाला दिला आहे. मात्र अनेक कारणांनी हे काम सुरू होऊ शकले नव्हते. आता या भूखंडावर सुसज्ज पार्किंग, सर्व अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र दालने असणार असून तक्रारदार आणि भेट घेणाऱ्यांसाठी बैठक व्यवस्था असेल. या ठिकाणी व्यायामशाळा आणि मेडिटेशनची अत्याधुनिक खोली साकारण्यात येणार आहे. तसेच स्तनदा मातांसाठी स्वतंत्र कक्ष आाणि जिल्हाधिकारी, कर्मचारी यांच्या मुलांसाठी पाळणा घराची व्यवस्थाही होणार आहे. यासाठी ७ ते ८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तांत्रिक बाबी पूर्ण होताच काही आठवडय़ांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
कोपरखैरणे पोलीस ठाण्यासाठी सिडकोने सेक्टर २० येथे सुमारे दोन हजार चौरस मीटरचा भूखंड दीड दशकांपूर्वी दिला आहे. त्याचेही काम रखडले होते.
या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तळमजला अधिक एक अशी दोन मजल्यांची ही इमारत असेल. एकूण १८ खोल्या असणार आहेत. पार्किंग व्यवस्थाही असेल. अंदाजे मार्च २०२३ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा असून याला साडेतीन कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
कोपरखैरणे आणि सानपाडा पोलीस ठाणे इमारती लवकरच उभारण्यात येतील. सानपाडा येथे सर्वात अद्ययावत पोलीस ठाणे साकारण्यात येणार आहे. याचे कामही लवकरच सुरू होईल. तळोजा आणि तुर्भे या दोन पोलीस ठाण्याच्या इमारतींबाबतही प्रयत्न सुरू आहेत. -अभिजित शिवथरे, पोलीस उपायुक्त, प्रशासन