डिसेंबर. कॅलेंडर वर्षांतील शेवटचा महिना. रविवारी, २५ डिसेंबरला नाताळ मोठय़ा आनंदाने साजरा केला जाईल. नाताळला केकचा सर्वाना भारी अप्रुप. म्हणजे फार वर्षांपासून नाताळ आणि केकचं नातं घट्ट झालं आहे. यासोबतीला चॉकलेट्स आणि या कुकीजही आहेतच. आजची तरुणाई नववर्ष आणि नाताळ हे दोन ‘इव्हेन्ट’ साजरे करण्यासाठी योजना आखतात. अशा नाताळप्रेमींसाठी चांगल्या केकची दुकानं शोधावी लागतात. नवी मुंबईत हा शोध कोपरखैरणेतील सेक्टर-१५ मध्ये पूर्ण होतो, असे म्हणायला हरकत नाही.

‘फ्रेश केक्स अ‍ॅण्ड ब्रेड्स लाइव्ह’ या केकच्या दुकानाची कोपरखैरणेत ख्याती आहे. या केकच्या दुकानाच्या नावातील शेवटचा ‘लाइव्ह’ हा शब्द आहे. या शब्दातच दुकानाच्या व्यवसायाचे गमक दडलेले आहे. इथे केक ऑर्डर्सनुसार तयार करून दिला जातो आणि तोही २० मिनिटांत. त्यामुळे ‘लाइव्ह’मध्ये ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. केकमध्ये वैविध्य असल्याने ‘लाइव्ह’ला खास करून महाविद्यालयीन तरुणांची पसंती आहे.

केकसोबत पेस्ट्री, कुकीज आणि स्नॅक्सची रेलचेल येथे आहे. ‘प्लम केक’ हे ‘लाइव्ह’मधील खास वैशिष्टय़ आहे. काही केकमध्ये ‘वाइन’चा वापरही त्याचा दर्जा वाढविण्यासाठी केला जातो. सुकामेवा, अर्थात ड्रायफ्रुटस्चा वापरही यात केला जातो. लाइव्हचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तातडीने केक बनविण्यासाठी सहा बल्लव (कुक) काम करतात. हे सहा जण ऑर्डरनुसार केक बनवितात. केकमध्ये डेझर्ट, तिरामसू, चीझ केक, सुकामेवा, ब्राऊनी, बनाना पुडिंग, अ‍ॅपल पाइन अशा विविध प्रकारचे केक आणि इतर पदार्थ मिळतात. पेस्ट्रीचे सर्व प्रकार येथे उपलब्ध आहेत. यात ब्लू बेरी, आमंड, कसाटा, कस्टर्ड अ‍ॅपल यांना मोठी मागणी असते. रीच क्रीमचे १२ पॅकेट, स्पॉण्ज मिक्सिंग २० किलो खर्ची पडते. सणासुदीच्या काळात दुकानात गर्दी वाढलेली असते.

घरची परिस्थिती बेताची असताना वडिलांचा आधार गेला आणि आईवर जबाबदारी आली. मी मोठा झाल्यानंतर तिला कमाईत मलाही मदत करावी लागली. बारावीनंतर १९९८ मध्ये कोल्हापूरहून मुंबईत आलो आणि छोटीमोठी कामे करीत या क्षेत्रात रीतसर प्रशिक्षण घेऊन व्यवसाय टाकल्याचं ‘लाइव्ह’चा मालक सुरेश पेडणेकर सांगतो.

सानपाडय़ातील ‘मोराज रेसिडेन्सी’ येथे २०१२ साली बेकरी व्यवसाय सुरू केला. त्यानंतर हळूहळू बेकरी उत्पादनाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि आज ‘फ्रेश केक अ‍ॅण्ड ब्रेडस् लाइव्ह’ला अमाप लोकप्रियता मिळाली आहे. बेकरी उद्योग क्षेत्रातील नामांकन ‘लाइव्ह’च्या ब्लॅक फॉरेस्ट पेस्ट्रीला मिळाले आहे. खाद्यपदार्थातील स्वच्छता आणि दर्जा यासाठी राष्ट्रीय नागरी आणि पर्यावरण संरक्षण संस्थेकडून ‘लाइव्ह’ला गौरविण्यात आले आहे. बेकरी व्यवसायातील पारसी लोकांची मक्तेदारी मोडून काढण्याबाबत सुरुवातीला थोडी मनात भीती होती, परंतु या क्षेत्रातील इत्थंभूत माहिती असल्याने हे धाडसी पाऊल आज यशस्वी ठरल्याचे पेडणेकर आवर्जुन नमूद करतात.

फ्रेश केक्स अ‍ॅण्ड ब्रेड्स लाइव्ह

स्थळ – अजंता को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, शॉप नं-५, सेक्टर-१५ डी मार्टच्या समोर, कोपरखैरणे

वेळ-    सकाळी १० ते रात्री १२.३० वाजेपर्यंत