नवी मुंबई : पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन जणांना व चोरीचे दागिने घेणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. अटक आरोपींकडून १० लाख २५ हजार किमतीचे २००.५० ग्रँम वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपींकडून २५ गुन्हे उकल झाले आहेत.
युसुफ सय्यद, गणेश शिंदे, सूरज रेवणकर अशी आरोपींची नावे आहेत. रमणिकलाल शहा हा फरार आहे. या आरोपींपैकी युसुफ आणि गणेश पोलीस असल्याची बतावणी करून सोने, चांदीचे दागिने चोरी करत होते तर सूरज हा हे चोरीचे दागिने विकत घेत होता.
पोलीस असल्याची बतावणी करून फसवणुकीचे प्रकार शहरात वाढले आहेत. पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह आणि गुन्हे शाखा उपायुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वाखाली यासाठी एक विशेष पथक नेमण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळाची व आसपासची सीसीटीव्ही चित्रण तपासणी केली. त्यात तीन संशयित आढळून आले. खबरींनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी गणेश याला मोहाली गाव कल्याण तर युसुफला बनेली गाव टिटवाळा येथून अटक केली. हे दोघेही चोरीचे दागिने उल्हासनगर येथील सूरज रेवणकर याला विकत होते. हे दागिने चोरीचे आहेत हे माहिती असूनही तो विकत घेत असल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे.
गुन्हे पद्धत : आरोपी हे
बाजारपेठ, रेल्वे स्टेशन, जॉगिंग ट्रँक, उद्यान अशा परिसरात ज्येष्ठ नागरिकांना एकटय़ात गाठून पोलीस असल्याची बतावणी करीत असत. पुढे अपघात, चोरी, हत्या, दंगल झाली असल्याचे कारणे सांगून अंगावरील सोन्याचे दागिने खिशात ठेवा, असा सल्ला देत असत. समोरचा व्यक्ती काळजीने दागिने रुमालात बांधून खिशात वा पर्समध्ये ठेवत असत. मात्र हे करत असताना चोरटे स्वत:कडील रुमाल त्यांना देत बोलण्यात गुंतवून दागिने बांधलेला रुमाल स्वत:कडे घेत पळून जात असत.
फरार आरोपीवर ३८ गुन्हे
युसुफ याच्या विरोधात घाटकोपर व मुलुंड येथे दोन तर मालाड पोलीस ठाणे अंतर्गत १ असे पाच गुन्हे उकल झाले आहेत. यात बेकायदा शस्त्र, फसवणूक आदी गुन्ह्याचा समवेश आहे. गणेश शिंदे याच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाणे येथे चार तर एसबीआय सीआयडी अंतर्गत पारपत्र कायद्यानुसार गुन्हा नोंद आहे. फरार असलेला रमणिकलाल शहा ऊर्फ सिकंदर याच्या विरोधात ३८ गुन्हे दाखल आहेत. या शिवाय पनवेल- ९, तळोजा व कामोठे ३, खारघर, रबाळे, वाशी पोलीस ठाणे अंतर्गत प्रत्येकी २, तसेच सानपाडा, कोपरखैरणे तुर्भे आणि खांदेश्वर येथे प्रत्येकी एक असे २५ गुन्हे उकल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang arrested cheating senior citizens police crime fraud senior citizens amy
First published on: 08-04-2022 at 01:09 IST