गौरीपूजनाचा सण म्हणजे माहेरवाशिणींसाठी आनंदाची पर्वणी. जसे महिलांसाठी गौरीपूजन तसेच उरणमधील पुरुष खास गौरापूजनाचा सण साजरा करतात. उरणमधील शिवकृपा मंडळातर्फे गेली ७५ वर्षे हा गौरापूजनाचा सण साजरा केला जात आहे. ज्या धर्तीवर पुरुषांकडून गौरी नाचविल्या जातात त्या धर्तीवर पुरुषांकडून गौरा नाचवला जातो.

गणेशोत्सवात गौरीपूजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वेळी सर्व महिला एकत्र येऊन पारंपरिक खेळ खेळतात. त्याचप्रमाणे उरणमधील शिवकृपा मंडळाकडून गौरापूजनाच्या निमित्ताने रात्रभर गौरा नाचाची प्रथा आहे. या गौरा उत्सवाच्या निमित्तानेच गणेशोत्सवात कोकणातील प्रसिद्ध बाल्या नाचाच्या स्पर्धाही भरविल्या जातात. या गौरांचे गौरीसोबतच विसर्जन केले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळात १९४१ला या गौरा मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. गावातील कायमस्वरूपी उभारण्यात आलेल्या मंदिरातच इको फ्रेंडली मखर तयार करून या गौरा गणपतीची स्थापना करण्यात आलेली आहे. हा उत्सव पाच दिवस साजरा केला जातो. तर शेवटच्या दिवशी भव्य मिरवणूक काढली जाते. तर करळ, सोनारी व सावरखार या गावात पुरुषांची गौरा मंडळे आहेत. ते गौरा स्थापना करून रात्री ढोलकीच्या तालावर नाच करीत शंकररूपी गौरा गणपतीचे जागरण करतात. यात फक्त पुरुषच सहभाग होतात. गेली अनेक वर्षे ही परंपरा सुरू आहे.