नवीन पनवेल येथील प्रभाग क्रमांक १७मध्ये भाजपचा विजय झाला. या प्रभागात पनवेल नगर परिषदेवर तीन वेळा निवडून गेलेले शेकापचे संदीप पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष सुनील घरत यांची कन्या शिवानी घरत हे मातब्बर उमेदवार होते. मात्र त्यांचा पराभव करून भाजपचे उमेदवार अ‍ॅड. मनोज भुजबळ हे विजयी झाले. अ‍ॅड. भुजबळ यांना ८,९५४ मते मिळाली. त्यांनी संदीप पाटील यांचा तीन हजार मतांनी पराभव केला. हा शेकापचा बालेकिल्ला मानला जातो.

कळंबोली येथील प्रभाग क्रमांक १० मध्ये राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वावर टीका करून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रामदास शेवाळे यांना ८५० मतांनी पराजयाचा सामना करावा लागला. शेवाळे यांच्या गटातील याच प्रभागामधून लढणाऱ्या भाजपच्या महिला उमेदवार मोनिका महानवर तसेच प्रभाग सातमधील उमेदवार राजेंद्र कुमार शर्मा यांचा विजय झाला. तक्का गावाचा काही भाग आणि काळुंद्रे गाव अशी प्रभाग रचना असणाऱ्या प्रभाग २० मध्ये शेकापने एक हाती तीनही जागांवर सत्ता राखण्याचा दावा केला होता. प्रभाग २० मधील तीनही जागांवर भाजपने शेकापचे सुनील बहिरा व त्यांची पत्नी श्वेता यांना पराजयाची धूळ चारली.

भाजपचे संतोष शेट्टी विजयी

नवीन पनवेल येथील प्रभाग १६ मध्ये दोन वेळा निवडणूक लढवून जिंकलेले संतोष शेट्टी यांच्याविरोधात जोरदार प्रचार उघडून शेकापने रान उठवले होते. शेट्टी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवून शेकापने जोरदार वातावरणनिर्मिती केली होती. मात्र मतदारांनी शेट्टी यांनाच विजयाची संधी दिली. शेट्टी यांना ६,९०९ मते मिळाली, तर महाआघाडीच्या शशिकला सिंग यांना केवळ १,४८९ मते मिळाली.

अल्पमताने पराभव

प्रभाग क्रमांक तीनमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपच्या उमदेवाराचा एका मताने पराभव झाला. शेकापचे अजिज मोहसिन पटेल येथून निवडणूक लढवत होते, तर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचे बंधू विनोद घरत यांनी भाजपमधून निवडणूक लढवून शेकापसमोर आव्हान उभे केले. पटेल यांना ७,१०६ मते मिळाली, तर घरत यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला. प्रभाग क्रमांक ६ येथेही अशीच चुरस पाहायला मिळाली. शेकाप महाआघाडीच्या उषा अडसुळे यांना २,५४३ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी भाजपच्या आरती नवघरे यांना २,५४८ मते मिळाली. अडसुळे यांचा पाच मतांनी पराभव झाला.

जनतेने  विकासाला मत दिले आहे.  आता विजय प्राप्त झाल्याने विकाचे रोल मॉडल इतरांसमोर ठेवू. पनवेल शहराला स्मार्ट सिटी बनविण्याचा मानस आहे.

  – परेश  ठाकुर,विजयी उमेदवार,  भाजप

शिवसेना या निवडणुकीत जरी एकही जागा जिंकू शकली नसली तरी, मताधिक्य वाढले आहे. सामान्यांना संधी मिळाली आहे शिवसेनेच्या यशाची  ही खरेतर नांदी आहे.

– आदेश बांदेकर, शिवसेना संपर्क प्रमुख