नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने बाजारपेठेत सध्या नवचैतन्य निर्माण झाले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध कंपन्यांनी अनेक खरेदी योजना सुरू केल्या आहेत. बाजारात मंदी असल्याने सराफ बाजार, बांधकाम क्षेत्र, कापड व्यवसाय, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदी सर्वच क्षेत्रांत ग्राहकपेठ मंदावली आहे. पितृपक्षामुळे अनेकांनी नवीन वाहन, घर, घरगुती उपकरणे घेण्याचा बेत पुढे ढकलले होते, मात्र नवरात्रोत्सव व दसऱ्याच्या मुहूर्तावर ही खरेदी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बांधकाम क्षेत्रात ग्राहकांचा प्रतिसाद नसला तरी दसऱ्याचा मुहूर्त साधून सदनिकांची विक्री होण्याची आशा बांधकाम व्यावसायिक बाळगून आहेत. त्यातच गृहकर्जाच्या दरात एक टक्का कपात झाली आहे. ग्राहकांनी पाठ फिरवल्याने बांधकाम व्यावसायिकांनी गृहखरेदीवर विशेष सवलती देऊ केल्या आहेत, असे बांधकाम व्यावसायिक नितीन गजरा यांनी सांगितले.
सोनेखरेदी वाढणार
सराफ बाजारातही यंदा गेल्या वर्षीच्या तुलेनत ग्राहकसंख्या निम्म्याने रोडावली आहे. सोन्याच्या दरांत झालेल्या घसरणीचा फायदा घेत दसऱ्याच्या दिवशी ग्राहक सोनेखरेदीकडे वळतील, अशी सराफ बाजाराची अटकळ आहे. सोन्याचे भाव साधारणपणे २६ ते २७ हजार रुपये तोळा स्थिर राहतील, त्यामध्ये घसरण होण्याची शक्यता कमीच असल्याचे ज्वेलर्स विक्रेते कांतीलाल मेहता यांनी सांगितले.
वाहनखरेदीकडे कल
दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन घेण्यासाठी विविध कंपन्यांच्या शोरूममध्ये ग्राहक चोखंदळपणे वाहनांच्या विविध मॉडेल्सविषयी विचारणा करीत आहेत. अनेक ठिकाणी चारचाकी तसेच दुचाकीची खरेदी सुरूही झाली आहे. यासाठी वाहन उत्पादक कंपन्या व त्यासाठी पतपुरवठा करणाऱ्या बँका यांनीही अनेक योजना देऊ केल्या आहेत.
कपडाबाजारात सवलत
तयार कपडय़ांच्या अनेक दुकानांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना मांडल्या आहेत. यात एकवर एक मोफत तसेच एकाच्या खरेदीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सवलत आदी प्रकार आहेत. पुढच्या महिन्यात दिवाळी येऊ घातल्याने दिवाळीची खरेदी आतापासूनच करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे, कपडेविक्रेते नानजीभाई पटेल यांनी सांगितले.