|| शेखर हंप्रस
विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दिग्गजांनी शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज भरले. मात्र ऐरोलीतून उमेदवारी दाखल केलेल्या एका उमेदवाराची चर्चा आहे. दिगंबर जाधव असे त्या उमेदवाराचे नाव असून तो रिक्षाचालक आहे. त्याला नवी मुंबईतील आरोग्य व्यवस्थेसह रिक्षाचालकांना घरकुल योजना मार्गी लावण्याचे स्वप्न बोलून दाखवले.
मूळ सोलापूर जिल्ह्य़ातील केगावचे असलेले दिगंबर जाधव अनेक वर्षांपासून महापे हनुमान नगर येथे राहतात. स्वत: रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकत असताना महागाई, आरोग्य सुविधा यांचा सामना करीत आहे. भाकरीचा चंद्र शोधण्यात आयुष्य घालवण्याऐवजी, ‘सिस्टीम’ला नावे ठेवण्याऐवजी बदल करण्यासाठी आपणच काहीतरी करावे, प्रेरणेतून त्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.
त्यांचा एकही कार्यकर्ता नसताना अर्ज भरताना शेकडो रिक्षाचालक मित्रमंडळी व नातेवाईक उपस्थित होते. आमदार म्हणून निवडून आल्यावर कशाला प्राधान्य देणार, असे विचारले असता, नवी मुंबईतील ढिसाळ आणि विस्कळीत झालेल्या आरोग्य व्यवस्थेला शिस्त लावण्यास प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मी स्वत: सामान्य कुटुंबातील असून या शहरात आमच्या सारख्यांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था नसेल तर ती काय कामाची असा त्यांचा प्रश्न आहे. या शिवाय रोजगार आणि स्वयंरोजगारावर भर देणार, सोलापूरमधील बिडी कामगारांच्या धर्तीवर नवी मुंबईतील रिक्षाचालकांना घरकुल योजना उपलब्ध करून देणाची त्यांनी इच्छा व्यक्त केली.