माहिती उशिरा मिळाल्यामुळे संभ्रम

नवी मुंबईत दमदार पाऊस पडल्यामुळे शहरातील बहुतेक शाळांना सुट्टी देण्यात आली, मात्र सुटी एवढी उशिरा जाहीर करण्यात आली की, सकाळच्या सत्रातील शाळा भरल्या आणि दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या पालकांना सुटी दिल्याची माहितीच न मिळाल्याने ते पाल्यांना घेऊन शाळेत पोहोचले.

१० जुलैला अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने एक आठवडय़ापूर्वीच व्यक्त केली होती. ७ जुलैपासूनच जोरदार पाऊस सुरू होता. त्यात ९ जुलैला रात्रीपर्यंत खंड पडला नव्हता. त्यामुळे रात्रीच सुटी जाहीर होणे अपेक्षित होते, असे मत अनेक पालकांनी व्यक्त केले. सकाळी मुसळधार पावसाचा सामना करत विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागले. तर दुपारी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर दुसऱ्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली.

नवी मुंबई पालिकेच्या शाळांच्या समन्वयकांना शिक्षण विभागाकडून सुटीचा संदेश ११.४५ च्या सुमारास मिळाला. त्यामुळे त्यांनाही पालकांना कळविण्यास पुरेसा अवधी न मिळाल्याने अनेक सुट्टीची माहिती शाळेत आल्यावर मिळाली, अशी खंत एका समन्वयकाने व्यक्त केली. पालिका प्रशासनाने सर्व पालकांना माहिती दिल्याचा दावा केला आहे.

हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. पाणी साचले होते, पावसाची संततधार सुरू होती, तरीही आदल्या दिवशीच सुटी जाहीर करणे गरजेचे होते. आजही भर पावसात सकाळची शाळा भरली, तर पाऊस कमी झाल्यावर दुपारच्या शाळेला सुट्टी दिली.   – शिरीष पाटील, पालक

शासनाचा आदेश वा अतिवृष्टी होत असतानाच शाळांना सुट्टी दिली जाते. सकाळच्या सत्रातील शाळा भरली असली तरी दुपारच्या सत्रात शाळांना सुटी दिली आहे. सुट्टी जाहीर केल्याची माहिती पालकांपर्यंत पोहोचवली आहे.        – संदीप संगवे, शिक्षणाधिकारी, नमुंमपा