शेखर हंप्रस

पालिकेची परवानगी न घेता गणेश मंडपांभोवती फलकबाजी; वाशी परिसरात नियमांचे उल्लंघन

गणेशोत्सव मंडपापासून शंभर मीटर अंतरावर दोन कमानी आणि मोजके फलक लावण्याचा नियम असताना वाशी येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मनमानी करीत मंडपांभोवती जाहिरातींची आरास केली आहे. लाखो रुपयांचा मोबदला घेऊन वाशीत सार्वजनिक ठिकाणी जाहिरातींचे फलक लावण्यात आले आहेत. या फलकबाजीमुळे एकीकडे परिसर विद्रूप झाला असतानाच, यातून पालिकेला मिळणारा महसूलही बुडवण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार मंडपापासून शंभर मीटर अंतरावर दोन कमानी उभारण्याची परवानगी आहे. त्यासाठी ठरावीक शुल्क आकारण्यात येते. मात्र वाशीसह नवी मुंबईतील अन्य भागांत मोठमोठय़ा गणेशोत्सव मंडळांनी हा नियम धाब्यावर बसवल्याचे दिसून येत आहे. या मंडळांच्या मंडपांच्या परिसरात सर्रासपणे जाहिरातींचे फलक लावण्यात आले आहेत. यासाठी मंडळांनी जाहिरातदारांकडून २० ते ४० हजार रुपये मोबदला घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाशी, सेक्टर १७ मधील एका बडय़ा गणेशोत्सवाला अवघे ३४ हजार रुपये परवानगी शुल्क आकारून परवाना देताना नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या मंडळाने उद्यानाच्या आवारात गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. मात्र जाहिरातींचे फलक उद्यानाच्या कुंपणावर झळकवण्यात आले आहेत. परवानगी शुल्क देण्यात आले असले तरी जाहिरातींची माळ मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आली असून त्याचा मोबदला आयोजकांच्या खिशात गेला आहे. शहरात अनेक प्रसिद्ध आणि प्रचंड गर्दी खेचणारी मंडळे आहेत. अशा ठिकाणी आपले बॅनर लावून जाहिरात करावयाची असल्यास त्यासाठी गणेश मंडळे भली मोठी वर्गणी वसूल करतात, अशी माहिती एका व्यावसायिकाने दिली. जाहिरातींच्या नावाखाली वसूल करण्यात येणाऱ्या पैशांचा कोणताही हिशेब मांडला जात नसून हा मलिदा मंडळातील पदाधिकारी खात असल्याचे बोलले जात आहे.

बेकायदा फलकांवर आम्ही कारवाई करीत आहोत. मात्र मंडपाच्या बाहेर जाहिराती लावल्यास त्यासाठी पालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. असे न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील.

– रवींद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका