scorecardresearch

निमित्त : साहित्य, संस्कृतीचे जतन

महाराष्ट्र सेवा संघामध्ये विविध विभाग असून ‘मैत्री’ हा महिलांचा विभाग आहे.

Organization Maharashtra Seva Sangh branch in Airoli
संगणकीकृत वाचनालयात वाचकांची गर्दी असते

महाराष्ट्र सेवा संघ, ऐरोली

संस्कृती, कला व साहित्याचा प्रसार करण्याच्या उद्देशाने मुलुंडमध्ये १९३७ पासून कार्यरत असलेल्या महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेची शाखा ऐरोलीत २००१ साली सुरू झाली. साहित्य, संस्कृतीच्या जतनाबरोबरच सामाजिक सलोखा जपण्याचे काम गेली १७ वर्षे संघ अविरत करत आहे. साहित्य मंदिर, वाशी हे नाव आता सर्वपरिचित झाले असून नवी मुंबईकरांना ते आपलेसे वाटत आहे.

नवी मुंबईत कला, साहित्य, संस्कृतीचा जपण्यासाठी सिडकोने ऐरोली सेक्टर १७ येथे भूखंड क्रमांक २४, २५वर पाच हजार चौरस मीटर जागा महाराष्ट्र सेवा संघाला सवलतीच्या दरात दिली. ऐरोली येथील महाराष्ट्र सेवा संघाचे पहिले अध्यक्ष मधुकर बापूराव देवधर आज ८५ वर्षांचे आहेत, परंतु आजही संस्था टिकावी, वाढावी यासाठी ते नेहमी मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतात. त्यांनीच संस्थेला सुरुवातीला २५ लाखांची मदत केली. सध्या संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सप्रे, सचिव शंकर वीरकर तर खजिनदार व महाराष्ट्र सेवा संघातील कला विभागाचे अध्यक्ष किशोर पेंढारकर यांच्याबरोबरच संस्थेचे सर्व सदस्य संस्थेच्या वृद्धीबरोबरच समाजाचे आपण काही देणे लागतो या भावनेतून ऐरोलीकरांसाठी  विविध कार्यक्रम आयोजित करतात. संस्थेची दोन मजली देखणी वास्तू असून त्यात हे कार्यक्रम होतात.

महाराष्ट्र सेवा संघामध्ये विविध विभाग असून ‘मैत्री’ हा महिलांचा विभाग आहे. या विभागाद्वारे महिला सदस्यांचे उद्बोधन, पारंपरिक खेळ, पाककला, सौंदर्यप्रसाधने याच बरोबर संस्कार शिबीर इत्यादी उपक्रम राबवले जातात. संस्थेचा आणखी एक महत्त्वाचा विभाग म्हणजे कला विभाग. या विभागाद्वारे दर महिन्याला एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच कथाकथन, संगीत आर्थिक विश्लेषणाचाही समावेश असतो. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला चित्रपट पाहण्याची संधी ‘प्रभात चित्र मंडळा’च्या माध्यमातून महाराष्ट्र संघ दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी मिळवून देतो. विविध विषयांवर मान्यवरांच्या उपस्थितीत विचारमंथन केले जाते.

या संस्थेचे सभागृह प्रशस्त असून तिथे विविध कार्यक्रम, सामरंभ आयोजित केले जातात. संस्थेच्या वास्तूतच १०० जणांची आसनव्यवस्था असलेले एक सभागृह आहे. तिथे परिसरातील संस्था आणि मंडळे नाटय़, अभिनय, भजन सादर करतात. तिथे विविध स्पर्धासाठीही हे सभागृह उपलब्ध करून दिले जाते. त्याच्या भाडय़ातून संस्थेचा आर्थिक डोलारा सांभाळला जातो. सभागृहात अच्युत महाराज सत्संग मंडळाद्वारे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. अच्युत महाराज संस्था अमरावती येथे मोठे सामाजिक कार्य करते. तिथे अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलही स्थापन करण्यात आले आहे. ज्यात रुग्णांवर अल्पदरात शस्त्रक्रिया केल्या जातात. त्या संस्थेच्या कार्याला हातभार लावण्यासाठी अल्पदरात जागा उपलब्ध करून दिली जाते. संस्थेची अभ्यासिका, ग्रंथालय याबरोबरच विविध उपक्रमांसाठी सुमारे १० कर्मचारी आहेत.

संस्थेद्वारे राबवण्यात येणारे जवळपास सर्वच उपक्रम नागरिकांसाठी मोफत आहेत. संस्थेने कला, साहित्य, संस्कृती, नाटय़, शिक्षण, अभिनय, चित्रपट विषयक अनेक उपक्रम राबवले आहेत. त्याला शाहीर साबळे, कवी अशोक नायगावकर, ज्येष्ठ चित्रकर्मी मोहन आगाशे, साहित्यिक अरुण साधू, समाजसेविका सिंधुताई सकपाळ, माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख, गणेश मतकरी, अविनाश व ऐश्वर्या नारकर, साधना सरगम, आरती अंकलीकर, प्रवीण दवणे, अमृता सुभाष, संभाजी भगत अशा मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे. त्यामुळे येथील मराठी जनांत या संस्थेला मानाचे स्थान आहे.

संस्थेचा १७ वा वर्धापनदिन ७ एप्रिल रोजी ऐरोली येथे साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात गायक प्रथमेश लघाटे यांच्या गीतांचा आनंद नवी मुंबईकरांना घेता येणार आहे.

अभ्यासिका आणि वाचनालय

* अतिशय अल्प दरात चालवली जाणारी अभ्यासिका हा या संस्थेचा सर्वाधिक स्तुत्य उपक्रम आहे. परिसरातील ज्या मुलांच्या घरी अभ्यासासाठी शांत वातावरण किंवा जागा नाही, असे विद्यार्थी येथे अभ्यासासाठी येतात. अभ्यासिकेत सुमारे ५०० विद्यर्थी आहेत.

* सकाळी ८ ते रात्री ९.३० वाजेपर्यंत इथे तरुणांचा राबता असतो. याच अभ्यासिकेत अभ्यास केलेल्या अनेकांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या यशाची पायाभरणी केली आहे.

* संस्थेने ‘वाचते व्हा’ हे उद्दिष्ट ठेवून संस्थेने तळमजल्यावर अत्यल्प दरात मोठे ग्रंथालय सुरू केले आहे.

* ग्रंथालयात ७८०० पुस्तके आहेत. ५५० सभासद आहेत. संगणकीकृत वाचनालयात वाचकांची गर्दी असते. ग्रंथालयाला शासनाचे कोणतेही अनुदान मिळत नाही.

संतोष जाधव – santoshnjadhav7@gmail.com

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-04-2018 at 01:28 IST