नवीन पनवेलमधील डॉक्टरवर कारवाईची शक्यता; तपासलेल्या ४०० रुग्णांची शोधाशोध

पनवेल : नवीन पनवेल वसाहतीमधील एका बालरोगतज्ज्ञाने स्वत:च्या मुलीच्या परदेश प्रवासाची माहिती लपवून मागील १५ दिवसांत ४०० हून अधिक बालकांवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. यामुळे पनवेल पालिकेने संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयातील बाह्य़रुग्ण तपासणीची सेवा तातडीने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच डॉक्टर पित्यासह मुलीलाही अलगीकरण कक्षात ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

संबंधित डॉक्टरांचे हे कृत्य उघड झाल्यानंतर मागील १५ दिवसांत संबंधित डॉक्टरांनी तपासलेल्या ४०० रुग्णांची शोधाशोध सुरू झाली आहे. पालिकेचे आरोग्य विभागाचे पथक या रुग्णांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती पालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. मागील आठवडय़ात ‘करोना विषाणू’च्या जनजागृतीसाठी पालिकेने बोलावलेल्या बैठकीत इतर डॉक्टरांसोबत संबंधित डॉक्टरचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

संबंधित डॉक्टर हे बालकांच्या रोगांवरील इलाजासाठी प्रसिद्ध आहेत. पनवेलमधील बालकांवरील गुंतागुंतीची शस्त्रक्रियेसाठीची सुविधा या बालरोगतज्ज्ञांच्या रुग्णालयात असल्याने येथे पहाटेपासून रुग्णांच्या रांगा असतात. संबंधित डॉक्टरची मुलगी १६ मार्चला अमेरिकेतून पनवेलमध्ये घरी परतली. तिला घरीच अलगीकरण राहण्याचे विमानतळावर सांगण्यात आले होते. संबंधित डॉक्टर आणि त्यांची कन्या ही एकाच घरात राहत असल्याने संबंधित डॉक्टरांनीही जनसंपर्क टाळणे गरजेचे होते. मात्र, या डॉक्टरांनी रुग्णसेवा सुरूच ठेवली. दरम्यानच्या काळात ४०० रुग्णांहून अधिक जणांना सेवा दिल्यानंतरही याबाबत पालिका अनभिज्ञ होती.

दोन दिवसांपासून विमानोड्डाण मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या परदेश प्रवास करून पनवेलमध्ये आलेल्या प्रवाशांची यादी तपासल्यानंतर डॉक्टरच्या मुलीचे नाव उजेडात आले.

पालिकेतील अनेक अधिकारी, डॉक्टर मंडळी संबंधित डॉक्टरच्या सान्निध्यात आले होते. सोमवारी सायंकाळी तातडीने पनवेल पालिकेचे आयुक्त देशमुख यांनी लेखी आदेश काढून संबंधित परदेश प्रवास करून आलेल्या घरातच अलगीकरण कक्षात ठेवण्यासह पुढील आदेश येईपर्यंत संबंधित डॉक्टरनी रुग्णालयात नवीन रुग्णांना प्रवेश देऊ नये, असे आदेश दिले. रुग्णालय तातडीने बंद करून पालिकेला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

..तर नोंदणी रद्द

मंगळवारी संबंधित डॉक्टरांच्या रुग्णालयात ३४ बालक उपचारार्थ दाखल होती. त्यापैकी तीन बालकांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याने इतर डॉक्टरांना रुग्णालयातील बालकांवर उपचारांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. यानंतरही संबंधित डॉक्टरची रुग्णसेवा सुरू दिसल्यास डॉक्टरची नोंदणी रद्द करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे. या घटनेनंतर पालिकेच्या आयुक्तांनी संबंधित डॉक्टरांनी रुग्णसेवा दिलेल्या एकाही रुग्णाला करोनाची बाधा झाल्यास त्यास संपूर्णपणे संबंधित डॉक्टर हेच जबाबदार असतील, असे स्पष्ट केले आहे.