पनवेल : गोल्फ कोर्स विस्तारात सिडकोकडून ८७३ झाडांचा बळी देण्यात येणार असल्याने याला पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध सुरू केल्यानंतर सिडकोने शुक्रवारी याबाबत स्पष्टीकरण दिले असून तोडण्यात येणाऱ्या झाडांचे पुनर्रोपण करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सिडकोने खारघरमध्ये गोल्फ कोर्स उभारला असून सध्या तो ९ होलचा आहे. या गोल्फ कोर्सचा १८ होल्समध्ये विस्तार करण्याचे सिडकोचे नियोजन आहे. या विस्तारात येथील डोंगररांगांवरील ८७३ झाडांची तोड करण्यात येणार असून सिडकोने यासाठी नवी मुंबईतील एका कमी खपाच्या वृत्तपत्रात हरकती व सूचनांसाठी आवाहन करीत जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात कुठेही या तोड करण्यात येणाऱ्या झाडांच्या पुनर्रोपणबाबत उल्लेख केला नव्हता. याबाबत सिडकोकडे विचारणा केली असता याबाबत बोलण्यास नकार दिला होता.

शुक्रवारी या वृक्षतोडीबाबत वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केल्यानंतर सिडकोने या बाबत शुक्रवारी त्यांचे म्हणणे मांडले आहे. यात खारघर येथील गोल्फ कोर्समध्ये अस्तित्वात असलेल्या ८७३ झाडांपैकी ७२७ झाडे कॅसुरिना इक्वेटिफॉलिया (सुरू वृक्ष) आहेत. ज्या गोल्फ कोर्सच्या विकासाच्या वेळी सिडकोने गोल्फ कोर्समध्ये ही झाडे लावली होती. ही ७२७ झाडे आणि इतर ७२ विविध प्रजातींची झाडे गोल्फ कोर्समध्ये प्रत्यारोपणासाठी प्रस्तावित आहेत. या झाडांच्या पुनर्रोपणाबरोबरच नवी मुंबईतील वनस्पती आणि प्राणीवर्ग लक्षात घेऊन देशी आणि स्थानिक जातींची नऊ हजार झाडे लावण्याचा प्रस्ताव असल्याचे सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी सांगितले आहे.