नवी मुंबई ही मूळची आगरी, कोळी भूमिपुत्रांची वस्ती. खाडीच्या जागेवर भराव टाकून येथे नागरी वस्ती उभी राहिली आहे. पूर्वी फक्त भूमिपुत्रांची बैठी घरे असलेल्या ठिकाणी बहुमजली असे टोलेजंग टॉवर उभे राहिले आहे. विशेष म्हणजे नोकरी व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले बहुभाषिक आता गुण्यागोविंदाने एकत्र राहु लागले आहे. त्यातच जिमी टॉवर वन अॅण्ड टू को-ऑप. हौसिंग सोसायटी (जिमी टॉवर) बहुभाषिक सोसयटी येथे नागरिक एकोपा ठेवून जगत आहे.
जिमी टॉवर वन अॅण्ड टू को-ऑप. हौसिंग सोसायटी (जिमी टॉवर) कोपरखरणे
नवी मुंबईतील कोपरखरणे रेल्वे स्टेशनपासून अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरावर जिमी टॉवर को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी आहे. जिमी टॉवरपासून एक किलोमीटर अंतरावर खाडीचा परिसर आहे. सोसयटीमध्ये बहुभाषिक नागरिक राहत असून येथे एकमेकांबद्दल एकोपा आहे. कोपरखरणेमधील सर्वात जुना असा बहुमजली टॉवर म्हणून जिमी टॉवरची ओळख आहे. सिडकोच्या १२.५ टक्क्यांतील निविदा भूखंडावर १९९६ मध्ये पुनित डेव्हलपर्स या विकासकाने १५ मजल्यांच्या दोन इमारती येथे उभ्या केल्या. इमारतीत जागेचा विस्तार असल्याने आणि त्यात त्या नियोजनबद्ध बांधण्यात आल्याने इमारती सुटसुटीत असल्याचे जाणवते. दोन टॉवरच्या या सोसायटीमध्ये एकूण ९० सदनिका आहे तर ४० व्यावसायिक दुकाने व दोन बंगलो आहे. येथे सर्व जातीधर्माचे नागरिक एकोप्याने राहत आहेत. पूर्वी नवी मुंबई पूर्णत: विकसित झाली नसल्याने केवळ गुंतवणूक म्हणून येथे सदनिका खरेदी करणाऱ्यांची संख्या जास्त होती. मात्र कालांतराने यातील बहुतांश सदनिका विकल्या गेल्या व नवीन मालकांनी ‘जिमी टॉवर’मध्ये घरोबा केला. या इमारतीत पंजाबी नागरिकांची संख्या जास्त आहेत. त्यामुळे उत्तर भारतीय सण येथे मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. मात्र अन्य सणांचा आनंदही येथे तेवढय़ाच प्रमाणात घेतला जातो.
खाडीच्या नजीक असणाऱ्या या परिसरामध्ये घर घेण्यास अनेक धजावत नव्हते. पूर्वी दळणवळणाच्या दृष्टीने वाहतूक व्यवस्थादेखील सुरळीत नव्हती. पण ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे-वाशी रेल्वे सुरू झाल्यावर कोपरखरणेचे महत्त्व वाढले. सुमारे २० वर्षांपूर्वी येथे १५०० रुपये प्रति चौरस फूट दराने खरेदी करण्यात आलेल्या सदनिकांचे दर आज कुठच्या कुठे जाऊन पोहोचले आहेत. जिमी टॉवरमधील प्रवेशद्वारांवर सुरक्षारक्षकांचा चोवीस तास पहारा असतो. याशिवाय सुरक्षेसाठी अन्य उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. सोसायटीत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासोबतच इंटरकॉम सुविधेने सर्व घरांना जोडण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेशद्वारावरच अनोळखी व्यक्तींबाबत खातरजमा करून त्यांना प्रवेश दिला जातो.
विविध सुविधा
सोसायटीचे अभिहस्तांतरण अद्याप झाले नसले तरी त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कार्यकारिणीतील सदस्यांचे म्हणणे आहे. सोसायटीमध्ये ओला कचरा व सुका कचऱ्यांचे वर्गीकरण करण्यात येते. सोसायटीच्या प्रवेशद्वारावरच पालिकेचे कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले आहे. जिमी टॉवरला पाणीपुरवठय़ाचा प्रश्न कधीही भेडसावला नाही. इमारतींच्या गच्चीवर तसेच भूमिगत पाण्याच्या टाक्या आहेत. या टाक्यांची दर सहा महिन्यांनी सफाई करण्यात येते. सोसयटीची दर रविवारी कमिटीची मीटिंग होते. त्यामध्ये सोसायटीमधील असणाऱ्या गोष्टींवर ऊहापोह करत रहिवाशांच्या असणाऱ्या समस्यांचे निराकरण केले जाते, असे सोसायटीमधील रहिवाशी अपर्णा बन्सल यांनी सांगितले. बांधकामाला २० वर्षे लोटल्यामुळे इमारतींमध्ये अनेक ठिकाणी गळती होते. त्यामुळे इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यानुसार डागडुजी करण्यात येत आहे. सोसायटीच्या गच्चीवर मोबाइल टॉवरना जागा करून देण्यात आली आहे. त्यातून सोसायटीला चांगले उत्पन्न मिळते.
या इमारतींमध्ये जागा प्रशस्त असली तरी खेळण्याचे उद्यान नाही. परंतु पहिल्या मजल्यावर लहान मुलांना खेळण्यासाठीचे साहित्य ठेवण्यात आले आहे. येथे लहान मुले घसरगुंडी, झोपाळे आदी खेळ खेळतात. इमारतीत सायकलिंग तसेच जॉगिंगसाठी स्वतंत्र मार्गिका ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे इमारतीतील सदस्यांना व्यायामासाठी दूर जावे लागत नाही.
बाहेरील वाहनांच्या पार्किंगचा त्रास
जिमी टॉवरमध्ये ८० स्टिल्थ पार्किंगची व्यवस्था आहे. याशिवाय खुल्या जागेवरही वाहने उभी करण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक वाहनाला स्टिकर देण्यात आले असून त्यानुसारच वाहनांना इमारतीत प्रवेश दिला जातो, असे सोसायटीमधील रहिवाशी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले. सोसायटी रोडला लागूनच असल्यामुळे येथे व्यावसायिक गाळे मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे दुकानासमोर मोठय़ा प्रमाणात वाहने पार्किं ग करण्यात येतात. त्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजूने वाहने पार्किंग केल्यास वाहतूक कोंडी होते. सम विषम पाकिंगची या ठिकाणी सोय करण्यात यावी अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
आवाहन
तुमचेही गृहसंकुल, सहकारी गृहनिर्माण संस्था, सोसायटी अशीच वैशिष्टपूर्ण आहेत? तुमच्या गृहसंकुलाविषयीची थोडक्यात माहिती आम्हाला कळवा. ‘लोकसत्ता महामुंबई’मध्ये अशा गृहसंकुलांना ‘कुटुंबसंकुल’ या सदरातून प्रसिद्धी दिली जाईल.
आमचा पत्ता
लोकसत्ता, ईएल-१३८, टीटीसी इंडस्टीयल एरिया, एमआयडीसी,
महापे, नवी मुंबई- ४००७१०
ईमेल: mahamumbainews@gmail.com