नवी मुंबई : वाशी येथील कृषी उत्पन्न फळ बाजारात आता देवगड हापूसबरोबर कर्नाटक हापूस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बाजारात कर्नाटक हापूसच्या २ ते ३ गाडय़ा दाखल होत आहेत.
यंदा कर्नाटक हापूसला पावसाचा फटका बसला असून आंबा उशिराने बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. देवगड, रत्नागिरीतील हापूस हा अवीट गोडीकरिता प्रसिद्ध असल्याने ग्राहक त्या हापूसला खास पसंती देत असतात. मात्र, यंदा तेथील हापूस आवकही कमी आहे. गुढीपाडव्यानंतर एपीएमसी बाजारात मोठय़ा प्रमाणात हापूस दाखल होण्यास सुरुवात होते.
दरवर्षी एप्रिलमध्ये एपीएमसी बाजारात देवगड हापूसच्या ८४-८५ हजार पेटय़ा दाखल होत असतात. मागील वर्षी ४०-४५ हजार पेटय़ा आवक झाली होती. यंदा अगदीच हापूसने २२ हजार पेटय़ांपर्यंत मजल मारली आहे. कर्नाटक हापूसची ८-१० गाडय़ा आवक होत असे. मात्र या वर्षी दिवसाला २-३ गाडय़ा दाखल होत आहेत. कर्नाटक हापूस रत्नागिरी, देवगड हापूससारखा दिसायला असला तरी चवीला मात्र कमी गोड असतो. एपीएमसी बाजारात सध्या हापूसची आवक कमी असून १० एप्रिलनंतर बाजारात आवक वाढेल. तसेच यंदा हापूसची मोठय़ा प्रमाणात आवक ही १० एप्रिल ते १० मे दरम्यानच राहील असे मत घाऊक व्यापारी संजय पिंपळे यांनी व्यक्त केले आहे. सध्या बाजारात हापूसला ५-६ डझन पेटीला ३ हजार ते ५ हजार तर कर्नाटक हापूसला प्रतिकिलोला १७०-२००रुपये बाजारभाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Karnataka hapus apmc market mango devgad karnatak ratnagiri hapus amy
First published on: 06-04-2022 at 01:44 IST