scorecardresearch

रानमेवा आवक घटली; दरही वधारले उरणमधील वने, जंगले नष्ट झाल्याचा परिणाम

विकासाच्या नावाने उरण तालुक्यातील वने व जंगल नष्ट होत असल्यामुळे रानमेवा मिळणे कमी झाले आहे.

उरण : विकासाच्या नावाने उरण तालुक्यातील वने व जंगल नष्ट होत असल्यामुळे रानमेवा मिळणे कमी झाले आहे. त्यामुळे उन्हाळय़ातील सहजगत्या मिळणारी जांभळे, रान्ना, जांभ, करवंदे व आंबे बाजारात आता कमी प्रमाणात येत आहेत. यामुळे याचे दरही वधारले आहे.
याबरोबरच यावर उपजिविका भागविणाऱ्या येथील आदिवासींच्या पारंपरिक व्यवसायावर संकट आले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
उरणमधील पूर्व विभागातील जंगले ही प्रचंड वन संपदेने बहरलेली होती. त्यामुळे वन्यजीवांसह येथील जंगलात परंपरेने वास्तव्य करणाऱ्या आदिवासींचाही उदरनिवार्ह होत होता. यात जंगलातील लाकूड फाटा गोळा करून तो गावोगावी जाऊन त्याची विक्री करणे, पावसाळय़ात येणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या गोळा करून त्यांची विक्री करणे, जोडीला जंगलातील शेती पिकविणे तर हिवाळा व उन्हाळय़ात जंगलात येणाऱ्या रानमेव्यांची विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत होते.
यामध्ये बहुतांशी जंगले ही रानमेव्यांनी बहरलेली असल्याने त्याचा फायदा आदिवासींना होत होता. मात्र जंगलातील फळ झाडे, वनस्पती नष्ट होत आहेत. परिणामी जंगलात मिळणारी फळे व रानमेवा यांची आवकच घटली आहे. आम्ही फ्रेन्डस ऑफ नेचर या संस्थेच्या माध्यमातून नष्ट होणाऱ्या जंगल परिसरात पुन्हा एकदा जंगल फुलावे याकरीता छोटासा प्रयत्न करीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी सांगितले.
२०० ते २५० रुपये किलो
जंगल नष्ट झाल्याने सध्या उन्हाळय़ातील रानमेवा कमी मिळत आहे. त्यामुळे किलोमागे ५० रूपयांची वाढ झाली असून २०० ते २५० रुपये किलोचे दर असल्याची माहिती रानमेवा विक्रेत्यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Legume arrivals decreased increased forest cover uran resulting deforestation amy