बंद होण्याच्या मार्गावरील कंपन्यांकडून जंतुनाशक, रुग्णांसाठीच्या फर्निचरची निर्मिती

शेखर हंप्रस, लोकसत्ता

नवी मुंबई : करोना साथरोगाला संकटाऐवजी संधी मानून ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्यांनी उत्पादन प्रक्रियेत बदल करून बाजारपेठेत स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. यात अनेक रासायनिक कंपन्यांनी जंतुनाशके आणि र्निजतुकीकरण करणाऱ्या साबणाच्या उत्पादनावर भर दिला. तर फर्निचर तयार करणाऱ्या कारखानदारांनी वैद्यकीय क्षेत्राला लागणाऱ्या वस्तूंची निर्मिती केली.

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीत लहान-मोठय़ा मिळून ४ हजारच्या आसपास कंपन्या आहेत. त्यात ५०हून अधिक कंपन्या या रासायनिक उत्पादने घेणाऱ्या आहेत. येथील उद्योगचक्र अविरत सुरू असल्याने रोजगाराच्या मोठय़ा संधी येथे निर्माण झाल्या आहेत. मात्र, मार्चअखेरीस करोनामुळे टाळेबंदी लागू झाल्याने औद्योगिक वसाहतीतील साऱ्या हालचाली बंद झाल्या. याचा कंपनी मालकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला. तरीही कल्पक उद्यमींनी या साऱ्या परिस्थितीचा मुकाबला करण्याचा निर्णय घेतला.

जंतुनाशके आणि साबण

योगेश्वर केमिकल कंपनीत रसायनांची निर्मिती केली जाते. करोनाकाळात ती बंद झाली. त्यामुळे मग कंपनी व्यवस्थापनाने  द्रवरूपातील साबण आणि जंतुनाशकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी लागणरा कच्चा माल मिळविण्यासाठी बरीच शोधाशोध करावी लागली. कंपनीत घाऊक उत्पादन पद्धती असल्याने छोटय़ा आकारातील पाकिटे तयार करून  ती उपलब्ध करणे सुरुवातीला शक्य झाले नाही. मालाची उपलब्धता असली तरी त्याची वाहतूक कशी करावी हा मुद्दा होता. मात्र, प्रयत्नात सातत्य ठेवल्याने प्रश्न सुटत गेल्याची  माहिती राकेश गोयल यांनी दिली.

रुग्णखाटांशेजारील कपाटांची निर्मिती

लोखंडी फर्निचरचे उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्यांमध्ये ए. सी. इलेक्ट्रोमेक इंजिनीअरिंगची उत्पादनाची मागणी शून्यावर आली. पण, म्हणून या कंपनीचे मालक किरण चुरी यांनी कंपनीतील कुशल कामगारांना टिकवून ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आणि काहीएक निधी त्यांच्या वेतनासाठी वापरण्याचे ठरवले.करोना रुग्णांना लागणाऱ्या खाटांच्या निर्मितीचे कंत्राट हातून गेले होते. तरीही चुरी यांनी आशा सोडली नाही. करोना रुग्णांसाठीच्या खाटेशेजारी असणारे छोटेखानी कपाट तयार करण्याचे कंत्राट मिळाले.

सरकारही सकारात्मक

द्रवरूपातील जंतुनाशकांच्या निर्मितीसाठी परवानगी घेणे गरजेचे असते. मात्र, टाळेबंदीत सरकारी कार्यालयात खेटे घालावे लागले नाहीत. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आणि काही परवानग्या दिल्या. त्यामुळे जंतुनाशक निर्मिती शक्य झाल्याचे नरेन शर्मा यांनी सांगितले.