ताज्या मासळीच्या गैरहजेरीत जिभेला चव आणणाऱ्या सुक्या मासळी बाजाराचा वेगळा रागरंग आहे. यात सुके बोंबील, करदी, सोडे, जवळा यांचा भरणा असतो. मुंबईत मरोळ मार्गावरून अंधेरीच्या दिशेने उजव्या बाजूला सुक्या मासळीचा मोठा बाजार भरतो. या बाजारात वसई, वर्सोवा, रायगड आणि मढ या भागांतील अनेक विक्रेते सुकी मासळी घेऊन बसतात. आठवडय़ात दोन दिवस हा बाजार भरतो. त्यामुळे खाद्यप्रेमींची चंगळ असते.

स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबईतील एका पारसी गृहस्थाने मरोळ मार्गावरील त्याच्या मालकीची जागा कोळीबांधवांना सुक्या मासळीची बाजारपेठ सुरू करण्यासाठी पालिकेकडे सुपूर्द केली होती. तेव्हापासून नऊ हजार ६०० चौरस मीटर जागेत सुक्या मासळीची बाजारपेठ भरवली जात आहे. पूर्वी येथे डहाणू, वेंगुर्ला, रायगड आणि कोकणातील इतर भागांतून आलेल्या सुक्या मासळीची मोठय़ा प्रमाणात विक्री होत असे. आठवडी बाजार दर शनिवारी-रविवारी मोठय़ा संख्येने भरत होता. बाजाराच्या आसपास सुक्या मासळीने भरलेले मोठे ट्रक, टेम्पो उभे असत. त्या वेळी संपूर्ण राज्यात सुकी मासळी पाठविण्याचे हे एक मोठे केंद्र होते. शिवाय सौदी, दुबई आणि इतर भागांतही या बाजारपेठेतून सुकी मासळी पाठवली जात होती; मात्र पारंपरिक मासेमारी कमी झाल्याचा फटका या मच्छीमारांना सहन करावा लागला. पर्ससीन जाळ्याच्या साहाय्याने मासेमारी सुरू झाल्यानंतर मच्छीमारांना समुद्रात पुरेसे मासे उपलब्ध होणे बंद झाले. त्यामुळे सुक्या मासळीच्या बाजाराला थोडा फटका सहन करावा लागला. तिची घाऊक बाजारपेठ हळूहळू कमी होत गेली आणि मुंबई आणि उपनगरातील कोळणी येथे सुकी मासळी विकण्यासाठी येऊ  लागल्या.

mango face mask for summer
उन्हाळ्यात फळांचा राजा घेईल तुमच्या थकलेल्या चेहऱ्याची काळजी! पाहा घरगुती मँगो फेस मास्क DIY
Ulhas river, pollution, Ulhas river latest news,
उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ? जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात
life of fish, fish in river, fish danger,
नदी, तलावातील माशांचे आयुष्य का धोक्यात आलंय? काय आहे नवं संशोधन?
Two more days of hailstrome in Vidarbha Pune news
विदर्भात आणखी दोन दिवस गारपीट; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्याना दिला इशारा

सध्या मरोळ येथे भरणारा हा बाजार घाऊक व किरकोळ अशा दोन्ही स्वरूपाचा आहे. त्यामुळे या बाजारात खरेदी करण्यासाठी स्थानिकांबरोबरच छोटय़ा छोटय़ा व्यावसायिकांची संख्याही जास्त असते.

पूर्वीच्या बाजारपेठेच्या रचनेनुसार येथे मढ, पटवाडी, मनोरी, भाटीगांव यांचे विभागवार विभाजन करण्यात आलेले आहे. सध्या महिला विक्रेत्या या जागेत सुक्या मासळीचा माल भरून ठेवतात. ‘ए ताई सुका बोंबील घे’.‘तुझ्यासाठी जवल्याचा वाटा वाढून देता’ अशी साद घालतात. यानंतर जर का एखाद्या ग्राहकाने घासाघीस करण्यास सुरुवात केलीच तर त्याला वाटा उचलण्यास भाग पाडतात. प्रसंगी ग्राहकावर हक्काने ओरडतातही.

सुक्या मासळीचा वाटा लावला जातो. यात टोपलीभर सुकी मासळीही विकली जाते. यात सुकी कोळंबी वा सोडय़ांचा अपवाद असतो. ती वजनावरच विकली जाते. याशिवाय बोंबील, करदी, जवळा, वाकटी, बांगडा, सुरमई ही मासळी वाटय़ाने विकली जाते. किमतीत थोडय़ा फार प्रमाणात कमी-अधिक केले जाते. मरोळमध्ये बोंबीलचा वाटा २०० रुपयाला विकला जातो. एका वाटय़ात साधारण ५० ते ६० सुके बोंबील असतात. तर एक करदीचा वाटा १५० रुपये, माकली १०० रुपये, वाकटी १५० रुपये आणि कजेंगरी ५० रुपयांनी विकला जातो. एका नग सुरमई मागे २०० रुपये तर पाच बांगडे १०० रुपयांनी विकले जातात. यात जवळा हा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असतो. एक जवळ्याचा वाटा हा ५० रुपयांनी विकला जातो. तर सुकी कोळंबी किंवा सोडे हे सर्वाधिक म्हणजे ८०० ते १००० रुपये किलोने विकले जातात. या आठवडय़ाच्या दोन दिवसांत येथे साधारण हजारो रुपयांची उलाढाल होत असते.

खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी कोळीबांधवांना बरीच मेहनत करावी लागते. सागरातून बोट आल्यानंतर त्यातील चांगली मासळी बाजारात विक्रीसाठी पाठविली जाते. तर त्यातील उरलेली मासळी या बंदराजवळच वाळवायला ठेवली जातात. हे मासे मीठ लावून वाळविले जातात. मीठ लावल्यामुळे मासे टिकतात. अनेकदा हे वाळवण जमिनीवर पसरून ठेवलेले असते. बोंबील वाळवायला मात्र स्वतंत्र सोय केलेली असते. बांबूवर या बोंबलांची तोंडे बांधून ते सुकेपर्यंत लटकवून ठेवली जातात. प्रत्येक मासळी वाळवण्याचा एक कालावधी ठरवून दिलेला असतो. त्याहून जास्त वेळ मासळी वाळवली गेली तर त्याची चव बिघडण्याची शक्यता असते. बोंबील वाळायला साधारण तीन दिवस लागतात. बोंबील आकाराने मोठा असेल तर पाच दिवसही वाळवत ठेवावा लागतो. सुरमई, वाम ही मासळी दोन ते तीन तास वाळवली जाते. ओला जवळा तर जमिनीवर पसरून ठेवला जातो आणि साधारण दोन दिवसांत कुरकुरीत वाळवला जातो.

हे सागरातील सोनं मरोळच्या बाजारात आजही चमकत आहे. पूर्वीचा बहरलेली सुक्या मासळीची बाजारपेठ पुन्हा सुरू व्हावी यासाठी मच्छीमार संघटना पर्ससीन जाळ्यांद्वारे केल्या जाणाऱ्या मासेमारीला कडाडून विरोध करीत आहे. १९३०-४० साली हा बाजार केवळ सुक्या माशांच्या विक्रीसाठी जाहीर केला असला तरी आज या बाजारातील अध्र्या जागेवर बोहारणींनी अतिक्रमण केले आहे. तर बाजाराभोवती अनेक छोटे छोटे व्यवसायही सुरू झाले आहेत. तर अनेकांसाठी हे बाजार दारूचे अड्डेही झाले आहेत. यातून कालांतराने आमचे अस्तित्व संपते की काय अशी भीती या बाजारातील कोळिणींमध्ये निर्माण झाली आहे. मुंबईत सुरू असलेल्या या जुन्या बाजारपेठांमधून इतिहासाच्या खुणा दिसतात. बाजारपेठेतून एक वेगळी संस्कृती उभी राहत असते. मात्र हा इतिहास टिकविण्यासाठी आधी बाजार तगून राहणे गरजेचे आहे.

मीनल गांगुर्डे

@MeenalGangurde8