पामबीचजवळील जंगलात आगीमुळे तिवारांचे नुकसान

रुग्णालयातील वैद्यकीय कचऱ्याची  शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे गरजेचे असतानाही तो खाडीलगत टाकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नेरूळ सेक्टर ४ येथे पामबीच मार्गाजवळ वनहद्दीत टाकलेल्या कचऱ्याला गुरुवारी सकाळी लागलेल्या आगीत  खारफुटीचे मोठे नुकसान झाले आहे.

हा कचरा नष्ट करण्यासाठी आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अग्निशमन पथक वेळेत पोहोचले अन्यथा मोठय़ा प्रमाणात खारफुटी वनस्पती यात खाक झाली असती.

मुंबईतील बोरिवली वनात आगीची घटना ताजी असल्याने या ठिकाणीही खारफुटी वनस्पती जाळण्यासाठीच आग लावली की काय? असा संशय व्यक्त होत होता. मात्र आग विझवल्यावर येथे मोठय़ा प्रमाणात मेडिकल वेस्ट पडलेले आढळून आले आहे. या ठिकाणी आग लागण्याची कुठलीच शक्यता नसल्याने ती लावल्यात आल्याचा संशय आहे.

आग लागल्यानंतर काही वेळातच आग विझवण्यात आली. आगीचे कारण स्पष्ट झालेले नसून आगीत खारफुटीचे नुकसान झाले. तसेच थर्माकोल आणि मेडिकल वेस्ट जळून गेल्याचे अग्निशमन अधिकारी अनिल सुर्वे यांनी सांगितले. घटनास्थळाची पाहणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके यांनी सांगितले.

आरोग्याला घातक

वापरलेले इंजेक्शन, सलाइनच्या बॉटल, औषधाच्या बाटल्या, बँडेज आदी वैद्यकीय कचरा उघडय़ावर टाकणे आरोग्याला घातक असते. या विरोधात कडक कारवाई करण्यात येते. असे असताना अधूनमधून हे प्रकार होत आहेत. पैसा वाचवण्यासाठी उघडय़ावर गुपचूप टाकत आहेत.

विल्हेवाट प्रक्रिया

हा कचरा वेचून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येक शहरात कंपनीची नेमणूक केली जाते. नवी मुंबईतही पालिकेने ‘बायोवेस्ट’साठी मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला कंत्राट दिले आहे. शहरातील बायोवेस्ट गोळा करून तळोजा येथील युनिटमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावली जाते.